कुडाळ: एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी दिली ताबापत्रांसह नवीन भूखंड देण्याची हमी

0

कुडाळ : कुडाळ नगरपंचयातच्या घनकचरा निर्मूलन प्रकल्पाच्या जागेप्रश्नी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पुकारलेल्या आंदोलनाची दखल शुक्रवारी दुपारपर्यंत एमआयडीसी प्रशासनाने न घेतल्याने 3 वा.च्या सुमारास संतप्त नगराध्यक्ष ओंकार तेलीसह सहकारी नगरसेवकांनी एमआयडीसी कार्यालयाच्या कंपाऊंडचा गेटच बंद केला. त्यानंतर चर्चेसाठी येणार्‍या एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना उपोषणकर्त्यांनी गेटच्या आतच रोखत जाब विचारला. यावेळी पोलिस निरीक्षक शंकर कोरे व नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी या प्रकल्पासाठी नवीन भूखंड व त्याचे ताबापत्र देण्याबाबतच लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर 32 तासांनी उपोषण स्थगित करण्यात आले. कुडाळ न.पं.च्या घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी न.पं.ने एमआयडीसीकडे भूखंडाची मागणी केली होती. त्यानुसार एमआयडीसीने भूखंड क. 171 मधील प्लॉट न.पं.ला दिला. मात्र, त्याला नेरूर व पिंगुळी ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्तांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर एमआयडीसीने या प्रकल्पाला स्थगिती दिली. ही स्थगिती उठवण्यासाठी न.पं.प्रशासनाने प्रयत्न केले. दुसरीकडे प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांनी त्या जागेत प्रकल्प होण्यास विरोधाची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे  नगराध्यक्ष ओंकार तेली व सहकारी नगरसेवकांनी गुरुवारपासून एमआयडीसी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण छेडत या प्रकल्पाला दिलेली स्थगिती उठवावी अन्यथा दुसरा प्लॉट द्यावा, अशी मागणी लावून धरली. रात्री एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी पी.टी. करावडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली मात्र ती निष्फळ ठरली. शुक्रवारी दुपारी 3 वा.पर्यंत प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त नगराध्यक्ष ओंकार तेली व नगरसेवकांनी एमआयडीसी कार्यालयाचा गेट बंद करून तीव्र रोष व्यक्त केला. त्यानंतर उपोषण कर्त्यांची भेट घेण्यास आलेेल्या अधिकार्‍यांना उपोषणकर्त्यांनी गेट बंद करून रोखले. त्याचवेळी तिथे उपस्थित  पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी उपोषणकर्त्यांना गेट उघडण्याची विनंती केली. मात्र उपोषणकर्ते आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने पोलिस फौज मागण्याच्या सूचना कोरे यांनी करताच संतप्त नगराध्यक्ष व नगरसेवकांनी त्यांना जाब विचारला. आम्हाला बिनधास्त अटक करा, आमचा संयम सुटला, आम्ही चुकीचे केले असेल तर कारवाई करा, असे नगराध्यक्षांनी त्यांना सुनावले. त्यानंतर नमते घेत गेट उघडण्यात आला. एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी पी.टी. करावडे, उपअभियंता अविनाश रेवंडकर व एरिया अधिकारी हरिश्चंद्र करावडे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. भूखंड क्र. 171 ऐवजी भूखंड क्र. जी-2/2 हा भूखंड न.पं.ला देण्यात येत असून या नवीन भूखंडावर बांधकाम विकासकामे करण्यासाठी नकाशे मंजुरी ऑनलाईन अर्ज केल्यावर तातडीने देण्याची कार्यवाही केली जाईल, असे लेखीपत्र नगराध्यक्ष श्री. तेली यांच्याकडे दिल्यानंतर उपोषण स्थगित करीत असल्याचे तेली यांनी जाहीर केले. नगराध्यक्ष ओंकार तेली, उपनगराध्यक्ष सौ. सायली मांजरेकर, नगरसेविका सौ. संध्या तेरसे, सौ. साक्षी सावंत, सौ.अश्विनी गावडे, सौ. सरोज जाधव, नगरसेवक सुनील बांदेकर, आबा धडाम, राकेश कांदे, स्मार्ट फोरमचे अध्यक्ष गजानन कांदळगावंकर, कुडाळ सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट, कुडाळ बचाव समिती अध्यक्ष अ‍ॅड. राजीव बिले, माजी जि.प.अध्यक्ष विकास कुडाळकर, स्वाभिमानचे माजी तालुकाध्यक्ष दीपक नारकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय प्रभू, शहर अध्यक्ष मंदार शिरसाट, मयूर शिरसाट, प्रसाद तेरसे आदींसह नागरिक उपस्थित होते.  शुक्रवारी सकाळी भाजपाच्या नगरसेविका सौ. उषा आठल्ये, निलेश तेंडुलकर, बंड्या सावंत, गजा वेंगुर्लेकर, विजय कांबळी, राजू बक्षी, मिलिंद देसाई, प्रशांत राणे यांनी पाठिंबा दिला. तसेच विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कुडाळवासीयांनी पाठिंबा दिला. नगराध्यक्ष श्री. तेली यांनी हा कुडाळ एकजुटीचा विजय असून उपोषणाला पाठिंबा तसेच सहकार्य करणार्‍या सर्वांचे आभार मानत असल्याचे सांगितले.  उपोषण  स्थगित केल्यावर अधिकार्‍यांसमवेत नवीन प्लॉटची पाहणी करण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here