सैन्य दलात कर्तव्यावर असताना शहीद झालेले हरचेरी (ता. रत्नागिरी) येथील सुभेदार भालचंद्र रामचंद्र झोरे (वय ५३) यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या हरचेरी या गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुभेदार झोरे अलाहाबाद येथे कर्तव्यावर असताना त्यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव आज पहाटे सहा वाजता मुंबई मार्गे त्यांच्या मूळ गावी हरचेरी येथे आणण्यात आले. फुलांनी सजविलेल्या रथावर तिरंग्यात गुंडाळलेल्या त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा सकाळी नऊ वाजता निघाली. यावेळी गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणावर अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सुनील चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, आमदार उदय सामंत आदींनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.
त्यानंतर बंदुकीच्या २१ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सध्या शहीद सुभेदार भालचंद्र झोरे यांचे कुटुंब पुणे येथे वास्तव्यासाठी होते. झोरे कुटुंबाचे अधुनमधून विशेष कामानिमित्ताने गावाला येणेजाणे असायचे. झोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
