एका मतदाराला जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः फोन करून मतदानास प्रवृत्त केले

0

रत्नागिरी : एका दिव्यांग मतदाराला मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वतः फोन केला आणि मतदानाचे महत्व पटवून सांगितले. वाडीच्या रस्त्यासाठी अडून बसलेल्या वृद्धाला व त्यांच्या मुलाला मतदानाचे महत्व पटवून देण्यात यश आले आणि अखेर या दोघांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीच्या व्यस्त कामकाजात देखील जास्तीत जास्त मतदान कसे होईल आणि कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतल्याचे या उदाहरणावरून पहावयास मिळाले आहे.

गुहागर मतदारसंघातील तिसंगी या खेड तालुक्यातील धनगरवाडीतील दिव्यांग मतदार रघुनाथ बबन गारे यांनी आपल्या वाडीचे ४०० मीटर रस्त्याचे काम झाल्याशिवाय मतदान करणार नाही, असे दिव्यांग मतदार सहाय्यकांना सांगितले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गारे यांच्याशी स्वतः संपर्क साधला आणि मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. रस्त्याचे काम होऊ शकेल, पण मतदान पुन्हा पाच वर्षे करता येणार नाही, हे त्यांना पटवून दिले. थेट जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क साधल्याने गारे आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्याचे अप्रूप वाटले आणि त्यांना मतदानाचे महत्वही पटले. त्यामुळे गारे पितापुत्रांनी मतदान केले. गारे ७० वर्षांचे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here