राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२१ ऑक्टोबर) मतदान पार पडले आहे. यानंतर आता सर्वांना उद्या (२४ ऑक्टोबर) निकालाची ओढ लागली आहे. निकाल लागण्यापूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांनी विजय मिरवणूक काढली. यामुळे कदमांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर कदम आणि समर्थकांनी खेड ते भरणे नाका याठिकाणी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना समज दिली.
पोलिसांच्या या आवाहनाला न जुमानता संजय कदम यांचा समर्थकांनी मिरवणूक चालू ठेवली. त्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागली. पोलिसांनी त्यांच्यावर निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कलम १४३, १४७, १४९, २६८, २९० अंतर्गत यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
