पावस पंचक्रोशीतील बिबट्या पकडण्यासाठी तज्ज्ञांकडून सर्व्हे

0

रत्नागिरी – पावस पंचक्रोशीत दुचाकीस्वारांवर वारंवार हल्ला करून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी तज्ज्ञांकडून गुप्त सर्व्हे सुरू आहे. मोठ्या बिबट्यांनी या भागातील आपली हद्द निश्‍चित केल्याने हल्लेखोर बिबट्या विस्थापित झाला आहे. तो जंगलातही जात नाही आणि मानवी वस्तीतही राहू शकत नसल्याने त्या भागात कुठेही फिरतो.

IMG-20220514-WA0009

वास्तव्य निश्‍चित नसल्याने 12 ट्रॅप कॅमेऱ्यामध्येही तो आढळून आलेला नाही. सापळा लावण्यापासून फ्रॅन्कच्युलाईट करण्याचा प्रस्ताव 23 ऑक्‍टोबरला नागपूर कार्यालयाला पाठविला आहे. तालुक्‍यातील पावस, गणेशगुळे, मावळंगे, नाखरे, गावखडी, पूर्णगड आदी भागात गेल्या तीन महिन्यांमध्ये हल्लेखोर बिबट्याने दहशत निर्माण केली आहे.

आतापर्यंत पाच ते सात वेळा हल्ला करून पंधरा जणांना जखमी केले आहे.

सायंकाळी हा बिबट्या त्या भागातून येणाऱ्या दुचाकीस्वरांवर हल्ला करून त्यांना जखमी करतो. या बिबट्याच्या दहशतीमुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तेथील लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी एकत्र येऊन याबाबत वन विभागाला जाब विचारला. हल्ल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेराओ घातला. वन विभाग आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांना अपेक्षित वेळेत उत्तर न आल्याने त्यांचेही हात बांधले गेले आहेत.

ग्रामस्थांच्या मागणीखातर बिबट्याला पकडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पिंजरे लावले, 12 ट्रॅप कॅमेरे लावले, गस्ती पथके नेमली आहेत, जनजागृतीसाठी फलक लावले आहेत, अशा अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र बिबट्या एकदा हल्ला केल्यानंतर पंधरा दिवस किंवा महिन्याने पुन्हा हल्ला करतो किंवा दर्शन घडत आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या 13 जणांना 5 लाख 30 हजारांपर्यंत मदत वाटप केली आहे.

सापळ्यात लावलेली शेळी चोरीला
बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याने ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधीच्या आग्रहाखातर कायदा लवचिक करून पिंजरे लावले होते. त्यामध्ये सावज म्हणून शेळी ठेवली होती. परंतु दुर्दैवी गोष्ट म्हणजे तेथील काही महाभागांनी ती शेळीही चोरून नेल्याची धक्कादायक बाब पुढे आली. बिबट्याच्या हल्ल्याचे भांडवल करून स्थानिकांकडून असहकार्य मिळत असल्याने वन विभागही चिंतातुर आहे.

म्हणून करतो बिबट्या हल्ला…
हल्लेखोर बिबट्याला काही महिन्यांपूर्वी एका दुचाकीस्वाराने ठोकर दिली होती. यामध्ये बिबट्या पळून गेला. परंतु दुचाकीस्वारांनी आणलेली अंडी आणि कोंबडी तिथेच पडली. बिबट्याच्या भीतीने स्वार सर्व साहित्य टाकून पळाले. मात्र बिबट्याने फिरून येऊन तेथे पडलेल्या कोंबड्या आणि अंडी फस्त केली. दुचाकीवर हल्ला केल्यावर काहीतरी खायला मिळते म्हणून वारंवार हल्ला होत असल्याचा तर्क वन विभागाने चौकशीनंतर बांधला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here