रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी चार जागा शिवसेनेला, एक राष्ट्रवादी काँग्रेसला

0

रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी चार विधानसभा निवडणुकांचा अधिकृत निकाल जाहीर झाला आहे. गुहागर मतदारसंघात मतदान यंत्रातल्या बिघाडामुळे अंतिम निकाल जाहीर होऊ शकलेला नाही.

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम एक लाख एक हजार ५७८ मतं मिळवून शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांच्यापेक्षा २९ हजार ९२४ अधिक मते मिळवून विजयी झाले आहेत. विद्यमान आमदार असलेले सदानंद चव्हाण यांना ७१ हजार ६५४ मते मिळाली.

रत्नागिरीत शिवसेनेचे उदय सामंत यांना एक लाख १८ हजार १६६, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदेश मयेकर यांना ३१ हजार १८ मते मिळाली.

उदय सामंत ८७ हजार १४८ मतांची आघाडी मिळवून चौथ्यांदा विजयी झाले आहेत.

दापोलीत शिवसेनेचे योगेश रामदास कदम विजयी झाले. त्यांना ९४ हजार ९९३, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वसंत कदम यांना ८१ हजार २६२ मते मिळाली. विद्यमान आमदार असलेले संजय कदम १३ हजार ७३१ मतांनी पराभूत झाले.

राजापूरमध्येही शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी ११ हजार ८९३ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. त्यांना ६५ हजार २५७, तर काँग्रेसचे अविनाश शांताराम लाड यांना ५३ हजार ३६४ मते मिळाली.

गुहागरमध्ये शिवसेनेचे भास्कर जाधव यांना ७८ हजार ३८०, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहदेव बेटकर यांना ५१ हजार ८८० मते मिळाली. भास्कर जाधव २६ हजार ५०० मतांनी विजयी झाले. मात्र हा निकाल अजून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here