चिपळूण : कोकण परिसरात सुरु असलेल्या धुवाँधार पावसाने जनजीवन अशरश: विस्कळीत झाले आहे. नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामीण भागातील लोकांना वाहतुकीसाठी मुख्य असणारी एसटीसेवा देखील ठप्प झाली आहे. चिपळूण एसटी डेपोमध्ये पुराचे पाणी आल्याने एसटीच्या २१२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. वाशिष्टी नदीच्या पुराचे पाणी चिपळूण एसटी डेपोत तीन फुटापर्यंत असल्यामुळे एसटीची एकही फेरी सुटली नाही. मुंबई-गोवा महामार्ग आणि चिपळूण-कराड मार्ग बंद पडल्यामुळे एसटीच्या वाहतुकीवर परिणाम झाला. ग्रामीण भागातील एकही एसटीची फेरी सोडण्यात आली नसल्याने ग्रामीण भागातील एसटी सेवेला पुराच्या पाण्याचा फटका बसला. त्यामुळे एसटी महमंडळाला तब्बल साडे चार लाखांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
