शेतकर्‍यांना भरपाई मिळावी यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांचे मुख्यमंत्री, मुख्य सचिवांना पत्र

0

रत्नागिरी जिल्ह्यात गेले 15 दिवस भरपूर पाऊस पडत आहे. दसर्‍यानंतर रत्नागिरीतील भातपीक तयार होते व त्याची कापणी करावी लागते. मात्र पाऊस लांबल्याने शेतात तयार असलेले भातपीक वाया गेले आहे. ज्या शेतकर्‍यांनी पावसाची उघडीप पाहून कापणी केली व भात सुकवण्यासाठी ठेवले ते भातदेखील पावसाने फुकट गेले. या पावसामुळे जिल्ह्यातील भात पिकवणार्‍या शेतकर्‍यांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. ताबडतोब पंचनामे करून शेतकर्‍यांना भरपाई मिळावी, असे पत्र भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव अजय मेहता यांना पाठवले आहे.

IMG-20220514-WA0009

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांच्याकडेही अ‍ॅड. पटवर्धन यांनी पत्र देऊन पाठपुरावा करण्यात येणार आहे.

या पत्रात पटवर्धन यांनी लिहिले आहे की, निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने याकडे कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष नाही. परिणामी झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे झाले नाहीत. झालेल्या प्रचंड नुकसानीकडे मी आपले लक्ष वेधत आहे. जिल्ह्यातील भातपिकाची झालेली नुकसानी पाहता तातडीने शासकीय यंत्रणेने पाहणी करून पंचनामे करण्याबाबत आपण आदेश द्यावेत. या नुकसानीची पाहणी होऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याचे आदेश द्यावेत.

आचारसंहिता चालू असल्याने निर्णयावर मर्यादा आहेत, याची कल्पना आहे. मात्र ही परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे आवश्यक तर निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी व त्या अनुषंगाने भरपाईबाबत निर्णय घ्यावा. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे भाजपा प्रभारी आमदार प्रसाद लाड यांच्याशी याबाबत बोलणे झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here