“हे सरकार तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय…”

0

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. १७ एप्रिलला होणाऱ्या या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करणार की राष्ट्रवादी भाजपचा याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशात आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नेते सभा घेताना दिसत आहेत. काल देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात सभा घेतल्या. त्यांच्या सभेतील काही वक्तव्यावरुन प्रसिध्द गायक आनंद शिंदे यांनी त्यांना टोला लगावला आहे.nदेवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की, सरकार बदलायचं माझ्यावर सोडा. त्यांच्या या वक्तव्यावर आनंद शिंदे म्हणाले की, ‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय’ असा इशारा आनंद शिंदेंनी दिला आहे. मित्र भारत भालके यांच्या प्रेमाखातर आनंद शिंदे हे त्यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सोमवारी मंगळवेढ्यात आले होते. आनंद शिंदे हे मूळचे मंगळवेढ्याचे आहेत. त्यांचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालेल्या भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी आनंद शिंदेंनी मंगळवेढ्यात उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी स्वर्गीय भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा देताना भगीरथ भालके यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.

आनंद शिंदे यांनी गाण्यातून घेतला फडणवीसांचा समाचार
आनंद शिंदे यांच्या सभेच्या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेढ्यात सभा झाली होती. त्या सभेत फडणवीस यांनी सरकार पाडण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. तोच धागा पकडत गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ‘त्यांना सांगायचंय मला’ असे म्हणत फडणवीसांच्या वक्तव्याचा एका गाण्याच्या माध्यमातून समाचार घेतला.
गाण्याच्या ओळी
तुम्ही चिडवताय,
आम्ही चिडणार नाय.
तुम्ही लय काय करताय,
तसं काय घडणार नाय.
तुम्ही रडवताय
पण आम्ही रडणार नाय.
हे पवार साहेबांचं सरकार हाय,
तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय.
आनंद शिंदे यांनी हे गाणे वाचताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने प्रतिसाद दिला. यावेळी धुरळा चित्रपटातील ‘नजर धारदार माणूस दमदार’ हे गाणे गात शिंदे यांनी भगीरथ भालके यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. दरम्यान, यावेळी तिथे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारही उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:18 AM 13-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here