तालुक्यातील पाली येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात पाली बाजारपेठेमध्ये भूसंपादित भागातील बाधित होणारी काही बांधकामे पाडण्यात आली असून त्याठिकाणी आवश्यक तेवढ्या नवीन महामार्गाच्या रुंदीसाठी जमीन सपाटीकरण करण्यात आले, आहे. मात्र, जुनी बांधकामे अद्याप तशीच असून जुन्या महामार्गाच्या दुतर्फा असणारी उघडी गटारे लांबच्या लांब जशीच्या तशीच ठेवल्याने त्यामध्ये महामार्गावरून जाणारी वाहने बाजूपट्टीवर घेताना गटारात जाऊन अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या चौपदरीकरणात एम. ई. पी या कंत्राटदार कंपनीने काही बांधकामे हटवली आहेत. परंतु दोन ठिकाणी जुन्या अस्तित्वातील महामार्गाच्या बाजूला ही धोकादायक गटारे उघडी ठेवली आहेत. तसेच या ठिकाणी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी रस्त्याच्या बाजूच्या झाडांचे बंधे जेसीबी मशिनने खणली जाऊन ते धोकादायक झाली आहेत.
