रत्नागिरीत पोलिसांनी मिनरल वॉटर वितरण यंत्रणा उभारली आहे. पोलीस वसाहतीसह नागरिकांनाही या सशुल्क यंत्रणेचा लाभ होणार आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयाजवळच्या पोलीस वसाहतीत काही महिन्यांपूर्वी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने हा प्रकल्प पूर्ण होऊ शकल नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या प्रश्नात जातीने लक्ष घातले. कोल्हापूर येथील मिनरल वॉटर यंत्रणा पुरविणाऱ्या एका खासगी संस्थेशी संपर्क साधून नवीन यंत्रणा उभी केली. पाण्यातील आयर्न, मिनरल प्रमाण कमी जास्त होणार नाही, या दृष्टीने ही संपूर्ण यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस उपअधीक्षक आयुब खान, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचेच पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, पोलीस निरीक्षक अनिल विभूते, कोल्हापूर एंटरप्रायझेसचे चावरे व इतर अधिकारी उपस्थित होते.
या यंत्रणेतून मिळणाऱ्या मिनरल वॉटरसाठी १०० रुपयांचे स्मार्ट कार्ड उपलब्ध करण्यात आले आहे. ५ रुपयांत २० लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. थंड पाणी १८ लिटरला १५ रुपये या दराने उपलब्ध होणार आहे. एक १ रुपयाचे नाणे टाकून १ लिटर पाणी तर ५ रुपयांचे नाणे टाकून २० लिटर पाणी कार्डधारकांसाठी उपलब्ध होणार आहे. कार्ड नसेल तर ५ रुपयांना २ लिटर, तर १ रुपयात २०० मिलि पाणी उपलब्ध होईल. या यंत्रणेतून पोलिसांसह इतर नागरिकांनाही पाणी उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. मुंढे यांनी केले आहे.
