रत्नागिरीत ५९ जणांना विंचूदंश

0

‘क्यार’ वादळानंतर गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या कडकडीत उन्हामुळे शेतीकामाला पुन्हा एकदा वेग आला आहे. पावसात कापून ठेवलेले पीक हाती लागावे म्हणून शेतकरी धडपडत आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांपुढे एक नवे संकट उभे आहे. गेल्या दोन दिवसात रत्नागिरीतील ५९ जणांना विंचूदंश झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विंचूदंश झालेल्या ५९ शेतकऱ्यांना रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर यातील तिघांना पुढील उपचाराकरता रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

.यामुळे वाढले विंचूचे प्रमाण

रत्नागिरीत पाऊस गेल्यानंतर पडलेले ऊन आणि त्यानंतर वादळी पावसाचा बसलेला तडाखा यामुळे अनेक ठिकाणी कापलेल्या भाताच्या पेंढ्या शेतातच पडून होत्या.

पेंढा उष्णता शोषत असल्यामुळे पावसातही पेंढ्याचा खालील भाग उष्ण राहतो. त्यामुळे विंचूसारखे प्राणी याखाली आश्रयाला येतात. त्यामुळे पेंढ्याच्याखाली मोठ्या प्रमाणात विंचू आढळून येत असून हेच विंचू शेतकऱ्यांना दंश करत आहेत. मागील काही वर्षातील विंचूदंशाची आकडेवारी पाहता भातकापणीच्या हंगामात विंचूदंशाचे प्रमाण यंदा वाढले आहे.

रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे २७ ऑक्टोबर रोजी ३८ रुग्ण दाखल झाले असून २८ ऑक्टोबर रोजी २१ विंचूदंशाचे रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात दरवर्षी अनेक विंचूदंशाचे रुग्ण दाखल होत असतात, गेल्या तीन वर्षांत तब्बल १ हजार ६७१ जणांवर जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here