वादळामुळे कोकणात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आपण प्रयत्नशील असून, खा. विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले असल्याची माहिती आ. उदय सामंत यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, कोकणात यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळला. कापणीयोग्य झालेले भातपिक नवरात्रीपूर्वी झालेल्या पावसात आडवे झाले होते. त्यानंतर कापणी करून शेतात ठेवलेल्या पिकाची गत आठवड्यात झालेल्या वादळी पावसाने वाताहात झाली.
तयार झालेल्या दाण्यातून पुन्हा नवे कोंब आले आहेत. त्यामुळे कोकणातील शेतकर्यांचे 75 ते 80 टक्के पिकांचे नुकसान झाले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सध्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये कोकणातील शेतकर्यांचे नुकसान होऊ नये म्हणून, शिवसेनेच्या शिष्टमंडळानेराज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना नुकसानीची माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. राज्यपाल कोश्यारी यांनी जानेवारी रत्नागिरीच्या दौर्यावर येण्याचे आश्वासनही दिल्याचे ते म्हणाले. यावेळी खा. विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवाडकर, माजी महापौर दत्ता दळवी, शैलेश परब, दत्ता नर आदी उपस्थित होते.
चिपळुणात पुन्हा भगवा फडकवणार
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याचा पाचही मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार उभे होते. यापैकी चिपळूण येथे पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाचे आत्मचिंतन करू. चिपळुणात जेथे कमी पडलो त्या कमतरता भरून काढून, पुढील पाच वर्षानंतर येथे पुन्हा भगवा फडकवू, असेही आ. उदय सामंत म्हणाले.
नाणारमध्ये जनतेसोबत
नाणारमध्ये उभारण्यात येणार्या रिफायनरी प्रकल्पाला तेथील जनेतेने विरोध केला आहे. शिवसेना तेथील जनतेसोबत असून, पक्षाने येथे रिफायनरी होऊ देणार नाही, असे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे वाटद येथील एमआयडीसीलाही तेथील स्थानिकांचा विरोध आहे. तेथेही आम्ही जनतेसोबत असून, त्यांना एमआयडीसी नको असेल तर त्यालाही आमचा विरोध आहे, असेही आ. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
