ही ‘भाऊबीज’ ठरली शेवटची.. तीन बहिणींच्या एकुलत्या एक भावाची आत्महत्या

0

दापोली,30 ऑक्टोबर: तीन बहिणींच्या एकुलत्या एक भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रकांत झगडे (26) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव असून तो राष्ट्रीय धावपटू होता. भाऊबिजेची भेट म्हणून तिन्ही बहिणींनी मिळून चंद्रकांतला बुलेट दिली होती. मात्र, बहिणींना देण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही, या नैराश्येतून चंद्रकांतने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

दापोली तालुक्यातील लाडघर येथे चंद्रकांत यांने जीवन संपवले. सगळ्यात धक्कादायक म्हणजे कालच भाऊबीज झाली. तीन बहिणींनी आपल्याला बुलेट दिली, मात्र बहिणींना देण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही, आपण बहिणीला काही देऊ शकलो नसल्याची खंत चंद्रकांतच्या मनात होती.

त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच तो कोणाशीही फारसा बोलत नव्हता. वडील बाहेरगावी मयताला निघाले असताना अर्ध्या रस्त्यातच त्यांना चंद्रकांतने आत्महत्या केल्याची खबर मिळाली. ते तातडीने घरी परतले. दुपारी घरी कोणी नसल्याचा अंदाज घेऊन चंद्रकांतने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुण्यात अनेक स्पर्धा गाजवल्या..

चंद्रकांत उत्कृष्ट धावपटू होता. त्याने पुण्यात अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. तो सुशिक्षित बेरोजगार होता. त्याच्या जाण्याने अनेकांच्या जीवाला चटका लागला आहे. तीन बहिणींनी मिळून दिलेली बुलेट चालवण्याची हौस देखील अधुरी राहिली असल्याची चर्चा आहे. बहिणीने भावाला भाऊबीजेची दिलेली भेट शेवटचीच ठरल्याचे बोलले जात आहे. त्याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्याने लिहिले आहे. पुणे बालेवाडी येथील धावण्याच्या अनेक स्पर्धा गाजवून गोल्डमेडल मिळवणाऱ्या चंद्रकांतची जीवनाच्या मैदानातून झालेली ‘एक्झिट’ अनेकांना चटका लावणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here