अकोला,30 ऑक्टोबर: अकोला आणि अमरावती जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. यात वीज कोसळून सात जणांचा जागेवरच मृत्यू झाला. गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज कोसळून अकोट व तेल्हारा तालुक्यातील एकूण चौघांचा जागेवरच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अकोट तालुक्यात बुधवारी विजेचा कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. लाडेगाव शेतशिवारात काम करत असताना दुपारी 3 वाजता शेतात वीज कोसळली. त्यात बेलूरा येथील 55 वर्षीय शेतमजूर दादाराव पळसपगार यांचा जागीच मृत्यु झाला. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये तेल्हारा तालुक्यातील तिघांचा वीज पडून मृत्यू झाला असून भोकर येथिल गणेश मोकळकार (वय-60) तर वरुड येथील गजानन अढाऊ (27) व लक्ष्मी नागोराव अढाऊ (वय 12) शेतात काम करत असताना अंगावर अचानक वीज पडून जागेवरच मृत्यू झाला आहे.
तसेच अकोला जिल्ह्यातील अकोली जहागीर या परिसरात आज जोरदार पावसासह गारपीट झाली गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ज्या झाडाखाली थांबले त्याच झाडावर कोसळली वीज
अमरावती जिल्ह्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. अमरावती ते अचलपूर मार्गावरील आसेगाव पूर्णा जवळ ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बोपापूर येथील सोनाली गजानन बोबडे (35), अचलपूरच्या विलायतपुरा येथील शोभा संजय गाठे (45) आणि अंजनगाव सुर्जी येथील सैय्यद निजामोद्दीन सैय्यद बदरोद्दीन (35) अशी मृतांची नावे आहेत. सोबतच इतर तीन जण यात जखमी झाले आहेत.
झाडाखाली थांबल्याने गेला तिघांचा जीव
काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामध्ये दुचाकीने अचलपूरकडे जाणाऱ्या काही प्रवाश्यांनी आसेगाव पूर्णा परिसरात झाडांचा आसरा घेतला. यात एका झाडाखाली तीन दुचाकीने जाणारे सहा जण उभे होते. याच झाडावर अचानक वीज कोसळली. या हृदयद्रावक घटनेत दोन महिला व एक पुरूष असा तिघांचा मृत्यू झाला.
मृतक सोनाली ही बडनेरा जुनीवस्ती माळीपुरा येथे राहणारा भाऊ स्वप्नील ज्ञानेश्वर वाठ (29) सोबत अचलपूर येथे दुचाकीने जात होते. मृतक शोभा गाठे ही महिला अमरावती येथील पीडीएमसी रुग्णालयात नातेवाईक दाखल असल्याने भेटण्यासाठी आली होती. ती देखील भावासोबत दुचाकीने अचलपूरला जात होती. तर मृतक सैय्यद निजामोद्दीन हे मुलासोबत दुचाकीने अंजनगाव सुर्जीला जात होते. या घटनेत अन्य तिघे जण जखमी झाले आहे.
