रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू

0

रत्नागिरी : जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली आहे. केवळ वैद्यकीय कारणासाठीच लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची वाहने जप्त केली जाणार आहेत. त्याच ठिकाणी त्यांची अँटिजेन चाचणी करून पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास त्यांना क्वारंटाइन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

जिल्ह्यात गुरुवारपासून संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू आहे. तसेच विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर दंड बसवण्यात येणार आहे. किराणा खरेदीसाठी होम डिलिव्हरीचा पर्याय निवडावा आणि जवळच्याच दुकानातून किराणा खरेदी करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. प्रत्येकाच्या अन्नधान्याचीच जबाबदारी शासनाने घेतली आहे. केवळ वैद्यकीय कारणासाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. वारंवार बजावूनसुद्धा नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यांना रत्नागिरीत मारुती मंदिर येथे अडवून त्यांची तपासणी केली जात आहे. त्यामध्ये परजिल्ह्यातून आलेल्या वाहनधारकांचाही समावेश आहे. त्यांची वाहने ताब्यात घेऊन लगेच करोना चाचणी केली जात आहे. दिवसभरात रत्नागिरी १०२ जणांची पोलिसांनी अँटिजेन चाचणी घेतली. त्यात ३ जण करोनाबाधित आढळले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महामार्गावरून जिल्ह्यात येणाऱ्यांची विशेष तपासणी नाक्यावर तपासणी केली जात आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकांर मात्र तशी कोणतीही व्यवस्था दिसली नाही. रत्नागिरीच्या रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाही. मुंबईहून जनशताब्दी एक्स्प्रेसमधून सुमारे शंभर प्रवासी आज सकाळी रत्नागिरी स्थानकात उतरले. पण स्थानकावर असलेल्या कक्षात केवळ १३ जणांनी नोंदणी केली. हे प्रवासी रत्नागिरी शहर, पावस, कारवांचीवाडी इत्यादी परिसरातील होते. इतर सर्व प्रवासी कोणत्याही तपासणीविना स्थानकातून निघून गेले. तपासणीच्या कक्षात केवळ एक कर्मचारी उपस्थित होता. प्रवाशांना तपासणी कक्षाकडे नेण्यासाठी कोणताही कर्मचारी नव्हता. प्रवाशांची तपमानासारखी प्राथमिक चाचणीही केली जात नव्हती. कक्षात पुरेसे कर्मचारी नव्हते. प्रवासीही त्या कक्षाकडे फिरकत नव्हते. मुंबईतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी आणि तपासणी केली जाणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. पण वस्तुस्थिती तशी नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांना याबाबत विचारले असता उद्यापासून रेल्वे स्थानकावर तिघांचे पथक चोवीस तास कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:12 AM 16-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here