‘सत्ता’पेच कायम; उद्या पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार

0

नवी दिल्लीः महाराष्ट्रातील सत्तापेचावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून हा पेच अद्याप न सुटल्याने सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. उद्या सकाळी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सर्व पक्षकारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी केली आहे. यात अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा समावेश आहे.

आज सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तापेचावर तातडीची सुनावणी करण्यात आली. सुप्रीम कोर्टात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडली तर भाजपकडून मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. कर्नाटकाचा हवाला देत अभिषेक मनू सिंघवी आजच बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने द्यावेत, तसेच गुप्त मतदानाऐवजी थेट मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली. ही मागणी त्यांनी वारंवार केली. राज्यपालाकडून शपथ देण्याची घाई करण्यात आली असून राज्यपाल कोणाच्या इशाऱ्यावर काम करतेय, असा प्रश्न सुप्रीम कोर्टात उपस्थित केला. घोडेबाजार रोखण्यासाठी आजच बहुमत चाचणी घ्यायला हवी, असा आग्रह या दोन्ही वकिलांनी कोर्टात धरला. महाराष्ट्रात जे झाले ते लोकशाहीची हत्या होती. काल ज्यांनी बहुमताचा दावा केला. ते आज विश्वासदर्शक ठरावापासून पळ का काढत आहेत, असा सवालही उपस्थित करण्यात आला. अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते राहिलेले नाहीत. भाजपकडे जर बहुमत असेल तर त्यांना बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यायला हवी, असे सिब्बल यांनी म्हटले. राष्ट्रवादीकडे ४१ आमदार असून या आमदारांच्या सह्याचं पत्र राज्यपालांना दिले आहे, असे सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात यायच्याआधी हायकोर्टात जायला हवे, असे तुषार मेहता यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्र्यांना नोटीस मिळेपर्यंत कोर्टाने कोणताही निर्णय देऊ नये, असे मुकुल रोहतगी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here