घटनादिन व विधीसेवा पंधरवाड्याचे औचित्य साधून रत्नागिरी विधी सेवा प्राधिकरणा मार्फत विविध सरकारी योजनांचे लाभ मिळवण्यासाठी व्यापक अशा विशेष महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे महाशिबीर 26 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता जिल्हा न्यायालय खारेघाट रोड येथे होणार आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आनंद सामंत यांनी दिली.
शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांमत बोलत होत़े समाजातील गरजू व दुर्बल लोक, सर्वसामान्य नागरिक, असंघटीत कामगार, शेतमजूर, बांधकाम मजूर, लघु उद्योग ,मोठया उद्योगातील कंत्राटी कामगार, मजूर,करागीर, घरेलू कामगार, वन उत्पन्नावर काम करणारे, मच्छिमार, रिक्षा चालक, हमाल, स्वयंरोजगार करणारे इत्यादीसाठी सरकारच्या विविध योजना आहेत़ मात्र विविध सरकारी योजनांचा लाभ हा गरजू लोकांना मिळत नाही. त्यामुळे या विशेष महाशिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सामंत यांनी सांगितले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण कायदा योजना, संजय गांधी निराधार योजना,सुकन्या समृध्दी योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, आयुष्यमान भारत पधानमंत्री जनआरोग्य योजना इत्यादी योजनांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शुन्य रक्कमेवर बँक खाते उघडून दिले जाणार आहे. तसेच ज्या व्यक्तींचे आधारकार्ड नाही, त्यांना जागेवरच आधारकार्ड काढून दिले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
तसेच कॅन्सर, हृदयरोग, किडनी इत्यादी दुर्धर आजार पीडीतांना जिल्हा परीषदे मार्पत रोख रक्कम 15,000 इतके सहाय्यता निधी दिली जाते, शेतकऱयांनी सात बारा व आधारकार्ड सादर केल्यास 2950 इतके रक्कमेची ताडपत्री दिली जाते यासांरख्या योजना पुरेश्या जनजागृतीमुळे समाजातील गरजू लोकांमार्पत पोहचत नाहीत, त्यामुळे या महाशिबीराचे आयोजित करण्यात आले आहे.
या महाशिबीरात जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास, विमुक्त जाती व भटकया जमाती विकास महामंडळ, मागासवर्गीय विकास महामंडळ, महात्मा फुले विकास महामंडळ, नगर परिषद रत्नागिरी, कौशल्य विकास महामंडळ, मनोरुग्णालय, आरोग्य विभाग, तहसिलदार रत्नागिरी, संजय गांधी निराधार योजना, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी, राष्ट्रीयकृत बँका व पोस्ट ऑफीस आदी कार्यालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आह़े त्यामुळे नागरीकांनी या महाशिबीरात येताना उपलब्ध असलेले मूळ शासकीय कागदपत्रे रहीवासी दाखला, जन्म पमाणपत्र, ओळखपत्र इत्यादीच्या झेरॉक्स प्रती सह उपस्थित रहावे, असे आवाहन रत्नागिरी विधी सेवा पाधिकरणा मार्फत करण्यात आले आहे.
