सतत बारमाही वाहणाऱया जगबुडी नदीपात्रात फेकल्या जाणाऱया कचऱयामुळे नदीपात्र दूषित बनत चालले आहे. यापुढे जगबुडी नदीपात्रात कचरा फेकल्यास रितसर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी स्पष्ट केले. जगबुडी नदीपात्र सदैव स्वच्छ ठेवण्यासाठी अभियान राबवण्यात येणार असल्याचे संकेतही दिले.
जगबुडी नदीपात्रानजीक रहिवासी वास्तव्यास आहेत. यापूर्वी नदीपात्र कचराबुडीच बनत चालले होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायम होती. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पुढाकार घेत नदीपात्रात कचरा फेकणाऱयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर नदीपात्रात कचरा फेकणाऱयांचे धाबे चांगलेच दणाणले होते. नगर प्रशासनाच्या आक्रमक भूमिकेनंतर नदीपात्र स्वच्छ राहण्यास मदत झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास कचरा फेकणाऱयांची संख्या वाढली आहे. यामुळे नदीपात्र पुन्हा अस्वच्छ बनत चालले आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शहराच्या स्वच्छतेसह जगबुडी नदीपात्राकडेही विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
