राज्यात २७ नोव्हेंबर रोजीच बहुमत चाचणी घेण्यात यावी. बहुमत चाचणी हंगामी अध्यक्षच घेतील.तसेच या चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, यात कोणतेही गुप्त मतदान नको, असा निर्णय सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश रामण्णा यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे उद्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व आमदारांचा शपथ विधी झाला पाहिजे असा आदेशही न्यायमूर्ती रामण्णा यांनी दिला आहे.
दरम्यान, लोकशाही मूल्यांचं संरक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार असून, त्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणं आवश्यक आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने ताबडतोब विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा, ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांनी केलेली विनंती मान्य करायची की नाही व मान्य केली तर विश्वासदर्शक ठराव केव्हा मंजूर करून घ्यायचा, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला.
या याचिकेवर आज तिसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टाने याचिकेवर निर्णय दिला. सोमवारी न्या. एन. व्ही. रामण्णा, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला, पण निकाल राखून ठेवला होता.
