कोरोनाचा वाढता धोका: एप्रिलच्या सोळा दिवसात जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक रुग्ण संख्या

0

🔳 मृत्यूच्याही संख्येत कमालीची वाढ

रत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशभरात सुरु आहे. त्याचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यातही जाणवत असून एप्रिलच्या सुरवातीला सोळा दिवसात तब्बल 3 हजार 531 रुग्ण सापडले. पहिल्या लाटेवेळी सप्टेंबर महिन्यात उच्चांकी रुग्ण संख्या होती. त्याप्रमाणेच एप्रिल महिना उच्चांकी रुग्णांचा ठरु शकतो. कोरोनाने भारतात प्रवेश केल्यानंतर मार्च महिन्यात अखेरच्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यात पहिला रुग्ण सापडला. मे महिन्यात पावणेतीनशे रुग्ण झाले. पुढे प्रत्येक महिन्यात संख्या वाढत गेली. गतवर्षी सर्वाधिक रुग्ण सप्टेंबर महिन्यात सापडले होते. याच कालावधीत सणोत्सव असल्यामुळे संपर्क वाढला आणि त्यामधून रुग्णांची भर पडली. सप्टेंबर 2020 मध्ये 3 हजार 881 रुग्ण सापडले होते. याच महिन्यात मृतांची संख्या 130 होती. त्यानंतर कोरोनाचा जोर ओसरत गेला. पुढे प्रत्येक महिन्यात दोनशेच्या दरम्यान रुग्ण सापडत होते. दुसऱ्या लाटेचा प्रभाव फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस दिसू लागला होता. मार्च महिन्यात पहिल्या पंधरवड्यात 267 तर दुसऱ्या पंधरवड्यात 788 रुग्ण सापडले. दुसरी लाट सुरु झाली असतानाच मुंबई, पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळत होते. याच कालावधीत कोकणात शिमगोत्सव, लग्नसोहळे यासह विविध उत्सव साजरे केले जात होते. चाकरमान्यांचा वावर वाढल्यामुळे पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णसंख्येत भर पडू लागली. एप्रिल महिन्यात सोळा दिवसात 3 हजार 531 रुग्ण सापडलेले आहेत. दुसऱ्या पंधरवड्यात यामध्ये आणखीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेतील सर्वाच्च रुग्णसंख्या ही एप्रिल महिन्यात राहणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 429 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात 130 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये 21 जणांचा मृत्यू झाला होता. फेब्रुवारी महिन्यात 16, मार्च महिन्यात 11 जणांचे मृत्यू झाला होता; मात्र एप्रिल महिन्यात आतापर्यंत सोळा दिवसात 52 रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे प्रमाण आणखीन वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:23 PM 17-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here