राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर वर्षा बंगल्यावर राजकीय घडामोडींना वेग आला होता. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक तातडीने बोलविण्यात आली होती. या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नसले तरी फडणवीस राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सुप्रीम कोर्टाने २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी व्हावी आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व आमदारांचा शपथ विधी झाला पाहिजे असा निर्णय दिला. तसेच बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे आणि कोणत्याही प्रकारचे गुप्त मतदान नको असे आदेशही न्यायमूर्ती रामण्णा यांनी दिला आहेत.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारने ताबडतोब विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश द्यावा, ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांनी केलेली विनंती मान्य करायची की नाही व मान्य केली तर विश्वासदर्शक ठराव केव्हा मंजूर करून घ्यायचा, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला.
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ ३० तास उरले आहेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. विश्वासदर्शक ठराव जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. तसे युक्तिवाददेखील त्यांच्या वकिलांकडून करण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपाला मोठा धक्का दिला आहे.
ही परिस्थिती पाहता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचा नेता निवडून आला, तरच विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जायचं. अन्यथा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा, अशी भूमिका भाजपाकडून घेण्यात आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात अशाच प्रकारे बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
भाजपा विश्वासदर्शक ठराव जिंकेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. तत्पूर्वी काल रात्री ग्रँड हयात हॉटेलमध्ये महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांनी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेत शक्तिप्रदर्शन केलं आहे. या आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पत्रदेखील महाविकासआघाडीकडून राज्यपालांना देण्यात आलं आहे. महाविकासआघाडीनं १६२ आमदार असल्याचा दावा केल्यानं भाजपा बहुमत कसं सिद्ध करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.