उपमुख्यमंत्रिदाचा अजित पवार यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता आमच्याकडे बहुमत नाहीये. मी देखील आता राज्यपालांकडे जाईन आणि राजीनामा देईन, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी 5 वर्षं केलेल्या कामाचा मला समाधान आहे. आज राजीनामा देताना मला समाधान आहे, पण काही गोष्टी राहून गेल्याचं दुःख आहे. मी जनतेचे मनापासून आभार मानतो, असं ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं. शिवसेनेला त्यांची लाचारी लखलाभ असो. भाजप जनतेचा आवाज बनून विरोधीपक्षाची भूमिका बजावेल. तीनचाकी सरकार वेगवेगळ्या दिशेने धावू लागल्यावर काय अवस्था होईल, याची मला सर्वाधिक चिंता वाटते, असंही ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रिपदी राहण्याचा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्यावर जमा झाला आहे. तसंच सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम वसंतदादांच्या नंतर त्यांच्यानावे आहे.
