मुंबई : सत्तेसाठी आम्ही घोडाबाजार करणार नाही, अशी आमची भूमिका आहे, त्यामुळे अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचवेळी येणारे तिरपांगडे सरकार किती काळ सरकार स्थीर सरकार देऊ शकेल, याबाबत मी साशंक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. या पत्रकार परिषदेनंतर आम्ही राज्यपालांकडे राजीनामा देण्यासाठी जात असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानुसार तत्यांनी राज्यपालांकडे राजीनाम सुपुर्त केला.
जनतेच्या मनात आम्हाला स्थान होते. भारतीय जनता पक्षाने लढवलेल्या जागांपैकी सुमारे 70 टक्के जागा जिंकल्या, तर शिवसेनेने जागा जिंकल्याचे प्रमाण 40 टक्क्यांच्या जवळ आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला जनतेने समर्थन दिले होते. तरीही ज्यावेळी निकाल आले त्यावेळी आपल्या समर्थनाशिवाय हे सरकार स्थापन होऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेने अचानक मुख्यमंत्री पदाची गोष्ट पुढे काढली. जे ठरले नाही ते ठरले, असे खोटे ठासून सांगण्यास सुरवात केली. पहिल्या पत्रकार परिषदेपासून त्यांनी ही भूमिका मांडून नंबर गेम सुरू केला, असे फडणवीस म्हणाले.
शिवसेनेला लाचारी लखलाभ
शिवसेना पाठींबा मागण्यासाठी सर्व पक्षाच्या दारोदारी लाजीरवाण्याप्रमाणे फिरत होते. मात्र त्यांनी आमच्याशी कधी आमच्याशी संपर्क साधला नाही. आम्ही मातोश्रीचे पावित्र्य जपले. मात्र, त्यांनी आता इतरांच्या दाराचे उंबरे झिजवले, अशी लाचारी त्यांना लखलाभ होवो.
आजपर्यंत मातोश्रीच्या बाहेर पाऊल न टाकणारे नेते दुसऱ्या नेत्यांचे उंबरे झिजवू लागले. मात्र त्यांनी आमच्याशी संपर्क तोडला. त्यांचे हिंदुत्व त्यांनी सोनियांच्या चरणी गहाण ठेवले. शिवसेनेचे नेते सोनियांशी एकनिष्ठ राहण्याच्या आणाभाका घेत होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ज्यावेळी पहिल्यांदा आम्हाला सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचे निमंत्रण मिळाले. त्यावेळी आम्ही बहुमत नसल्याचे सांगून त्यास नकार दिला. मात्र, त्यानंतर शिवसेनेने बहुमत सिध्द करण्यास असमर्थता दाखविली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर राज्यात स्थीर सरकार देण्यासाठी अजित पवार आमच्या सोबत आले. आम्ही महाराष्ट्राला स्थीर सरकार देण्यासाठी एकत्र आलो. ते राष्ट्रवादीचे गटनेते होते, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व आमदारांची यादी दिली. ती आम्ही राज्यपालांना दिली. त्यानंतर शपथविधी झाला.
अजित पवारांच्या आरोपांचे काय?
अजित पवार यांना तुम्ही कारागृहात चक्की पिसायला पाठवणार असे म्हटले होते. मात्र त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले. त्याबाबत काय सांगाल असे विचारता, मुख्यमंत्री म्हणाले, अजित पवार राष्ट्रवादीचे गट नेते होते. त्यामुळे त्यांना सोबात घेणे आवश्यक होते. कोण चुकीचे हे नंतर ठरवू, असे सांगून यावर अधिक भाष्य करणे टाळले.
अजित पवार यांनी आज मला मी भाजपासह येऊ शकत नाही, असे सांगून आपला राजीनामा दिला. त्यानंतर आम्ही बहुमतात नसल्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आम्ही घोडे बाजार करणार नाही असे आधीच सांगितले होते. त्यानुसार आम्ही सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत बसू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हे सरकार विरोधी विचार धारेचे आहे. त्यामुळे ते किती टिकेल हे सांगता येत नाही. मात्र या सरकारला मी शुभेच्छा देतो, असे ते म्हणाले.
