खेड भरणे मार्गावरील प्रबोधनकार ठाकरे उद्यानाच्या शुशोभीकरणाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. नगरोत्थान योजनेतून या साठी 66 लाख 87 हजार रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रसारमाध्यमांच्या रेट्यानंतर प्रशासनाने सुशोभीकरणाच्या निर्णय घेतल्याने गेली अनेक वर्षे रया गेलेल्या अवस्थेत असलेल्या उद्यानाला नवा साज चढण्याबरोबरच गेली काही वर्षे ओस पडलेले उद्यान बच्चे मंडळींच्या किलबिलाटाने गजबजणार आहे. खेड शहरामध्ये बच्चे मंडळीला खेळण्यासाठी एकही मैदान नसल्याने इथे उद्यानाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत खेडचे तत्कालीन आमदार आणि विद्यमान शिवसेना नेते रामदास कदम यांनी खेडमध्ये जिजामाता आणि प्रबोधनकार ठाकरे या दोन उद्यानाची उभारणी केली. प्रबोधनकार ठाकरे उद्यानाचे उदघाटन खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केल्याने या उद्यानाला खेड शिवसेनेच्या दृष्टीने विशेष महत्व आहे.
या उद्यानाच्या उभारणी नंतर खेड शहरातील बच्चे कंपनीला खेळण्यासाठी एक हक्काची जागा उपलब्ध झाली होती. शिवाय जेष्ठ नागरिकांनाही संध्याकाळचा फावला वेळ आपल्या नातवंडांसह घालवता येऊ लागला होता. या उद्यानात बसवण्यात आलेल्या आगगाडीत बसून मामाच्या गावाला जाताना बच्चे मंडळीला विशेष आनंद वाटत असल्याने ही आगगाडी बच्चे मंडळींचे खास आकर्षण ठरली होती. उद्यानातील इतर खेळणीही बच्चे मंडळीला खुणावणारी होती त्यामुळे शनिवार , रविवार या उद्यानात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पहावयास मिळत असे. सुरवातीची काही वर्षे हे उद्यान बच्चे मंडळींच्या गर्दीने गजबजलेले असे मात्र नगरपालिका प्रशासनाकडून उद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने काही वर्षातच उद्यानाची दुरवस्था झाली आणि उद्यानाकडे बच्चे मंडळींसह जेष्ठ नागरिकांनीही पाठ फिरवली.
पुढे पुढे या उद्यानाची अवस्था अतिशय दयनीय झाली. पावसाळ्यात उद्यानात वाढलेले गवत काढण्यास प्रशासनाला वेळ न मिळाल्याने उद्यान गवताचे कुरण झाले. त्यामध्ये सापांचा अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आणि उद्यानात पाय ठेवणेही धोकादायक झाले. वापराअभावी उद्यानातील खेळण्यांना गंज चढला. खेळणी तुटली. बच्चे मंडळींचे आकर्षण असलेली आगीनगाडी पटरीवरून कायमची खाली उतरली. आगीनगाडीचे इंजिन बंद पडले. 2016 च्या डिसेंबर महिन्यात या उद्यानाचे खासगी विकासकाकडून शुशोभीकरणाचा प्रयत्न झाला. कामही सुरु झाले. मात्र त्यावेळी एका लोकप्रतिनिधीने याला विरोध केल्याने शुशोभीकरणाचे काम बंद करावे लागले होते. खासगी विकासकाला विरोध केल्यानंतर हे काम नगरपालिका प्रशासनाने हाती घेणे अपेक्षित होते मात्र गेली तीन वर्षे उद्यानाकडे पाहण्यासही प्रशासनाला वेळ मिळाला नाही. परिणामी उद्यानाची अवस्था अतिशय दयनीय झाली. गेली काही वर्षे स्थानिक माध्यमातून उद्यानाची अवस्था सचित्र मांडली जात होती. उद्यानाची डागडुजी करण्याची वारंवार मागणी केली जात होती. मात्र प्रशासन ढिम्म होत.
प्रशासनाकडून उद्यान शुशोभीकरणाचा कोणताही निर्णय घेतला जात नव्हता. अखेर नगरोत्थान मधून 66 लाख 87 हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्यानंतर एक वर्षांपूर्वी तत्कालीन पालक मंत्री रवींद्र वाईकर यांनी सुशोभीकरणाच्या शुभारंभाचा नारळ फोडण्यात आला. त्यावेळी आता रया गेलेल्या या उद्यानाला पुन्हा नवा साज चढेल असे वाटले होते मात्र हे काम नारळ फोडण्यापलीकडे गेलेच नसल्याने उद्यानाला नवा साज चढण्याच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. मात्र आता पुन्हा एकदा शुशोभीकरणाचा नारळ फुटला असून प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरवात केली आहे. सद्य स्थितीत युद्धपातळीवर उद्यानाची साफसफाई आणि सपाटीकरणाचे काम सुरु असल्याने येत्या काही दिवसातच प्रबोधनकार ठाकरे उद्यानाला नवा साज चढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय संकेतानुसार येत्या काही दिवसात या उद्यानात नवी आणि अद्यावत खेळणीही बसवण्यात येणार आहेत त्यामुळे गेली काही वर्षे ओस पडलेले उद्यान पुन्हा बच्चे मंडळींच्या किलबिलाटाने गजबजणार आहे.
