खरीप पीक कर्जवाटपात रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी

0

रत्नागिरी : खरीप पीक कर्जवाटपात रत्नागिरी जिल्ह्याने खरिप हंगामासाठीचे उद्दिष्ट ११५ टक्के पूर्ण केले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक नंदकिशोर पाटील यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे प्रोत्साहन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे ही उद्दिष्टपूर्ती शक्य झाली, असे ते म्हणाले.

जिल्ह्यासाठी नुकत्याच संपलेल्या खरीप हंगामासाठी २३१ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. प्रत्यक्षात गेल्या ३१ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २६४ कोटी ७१ लाख रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. एकूण उद्दिष्टाच्या ११५ पट वाटप करून जिल्ह्यातील बँकांनी उत्तम सेवा दिली. त्यात सर्वांत मोठा वाटा बँक ऑफ महाराष्ट्रचा होता, असेही पाटील यांनी सांगितले.

खरीप पीक कर्जवाटपासंदर्भात राज्याचा आढावा गेल्या २० नोव्हेंबर रोजी मुंबईत घेण्यात आला. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसरा ठरला आहे.यंदाच्या आर्थिक वर्षात खरीप आणि रबी हंगामासाठीचे जिल्ह्यात पतपुरवठ्याचे एकूण उद्दिष्ट ५२० कोटी रुपये इतके होईल. ते देखील निश्चितपणे पूर्ण होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here