रत्नागिरी : जिल्हयात . २६ नोव्हेंबर पासून सातवी आर्थिक गणना सुरू होणार आहे. पूर्णपणे पेपरलेस म्हणजेच डिजिटल स्वरूपात होणाऱ्या या गणनेसाठी नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे सातव्या आर्थिक गणनेचा कार्यक्रम उद्या सुरू होत आहे. देशात सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयातर्फे १९७७ मध्ये पहिली आर्थिक गणना करण्यात आली होती. यंदाची सातवी आर्थिक गणना आहे. गेल्या वेळच्या, सहाव्या आर्थिक गणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात ५२ हजार ७१९, तर शहरी भागात १९ हजार ५९१ अशा एकूण ७२ हजार ३१० उद्योगांची नोंद झाली होती. यावेळी त्यात साधारण तीस टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.
सामायिक सेवा केंद्राच्या वतीने ही गणना जिल्ह्यात होईल. त्यात २४४ पर्यवेक्षक आणि १७५ प्रगणक सहभागी होणार आहेत. यंदा प्रथमच पेपरलेस गणना होणार असून त्यात मोबाइल ॲपचा वापर होणार आहे.
आर्थिक गणनेत घरगुती उपक्रमांसह शेती आणि बिगरशेती क्षेत्रातील वस्तू, सेवा (स्वत:च्या वापराच्या एकमात्र उद्देशाव्यतिरिक्त) उत्पादन किंवा वितरणात गुंतलेल्या सर्व आस्थापनांचा समावेश असेल. २०१३ मध्ये झालेल्या सहाव्या आर्थिक गणनेनुसारच माहिती संकलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत सहा आर्थिक गणना झाल्या. पहिली आर्थिक गणना १९७७ मध्ये, त्यानंतर १९८०, १९९०, १९९८, २००५ आणि २०१३ साली आर्थिक गणऩा झाली होती. यावेळच्या आर्थिक गणनेत घरोघरी येणाऱ्या प्रगणकाला योग्य आणि अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी केले आहे.