रत्नागिरी (वार्ताहर) : आम्ही भाड्याने रहातो, खोलीचा मेंटेनन्स तुम्ही ठेवायचा असे भाडेकरुने सांगताच संतप्त झालेल्या घरमालकांनी भाडेकरुवर चाकूने हल्ला करुन त्याच्यावर सपासप वार केल्याची घटना गोळा येथे घडली. याप्रकरणी पूर्णगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युसुफ जिक्रिया पावसकर व इब्राहिम सलाम पावसकर हे दोघे नातेवाईक असून यातील युसुफ हा इब्राहिम याच्याकडे भाड्याने रहात होता. घरात लाईट नसल्याने युसुफ याने इब्राहिम याच्या आईला त्याबाबत सांगितले, आम्ही भाड्याने रहातो, मेंटेनन्स बघायचे तुमचे काम आहे. युसुफ याची ही वाक्य इब्राहिम याने ऐकल्यानंतर त्या दोघांमध्ये खडाजंगी झाली. इब्राहिम यांनी धारदार चाकूने युसुफ याच्यावर हल्ला चढवून त्याच्या शरीरावर तीन वार केले. दोन बार डोक्यात केले असून एक वार पाठीजवळ केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या युसुफ याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी इब्राहिम सलाम पावसकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
