पिंपर (ता. गुहागर) येथील अनंत विश्राम देवळे (वय ५०) यांच्या खून प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात दोघांना अटक झाली आहे.
सहाणवाडी, पिंपर येथील अऩंत देवळे यांचा गेल्या १३ ऑगस्टच्या रात्री खून झाला होता. हत्याराने कपाळावर आणि डोक्यावर तसेच शरीराच्या इतर भागावर झालेल्या जखमांमुळे ते जागीच ठार झाले होते. या प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना आतापर्यंत ३६ साक्षीदारांकडे पोलिसांनी चौकशी केली. सर्व संशयित व्यक्तींचे मोबाइल सीडीआर तसेच घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्याआधारे आरोपीचा शोध सुरू होता. घटनेच्या दिवशी घटनास्थळाजवळच रस्त्यावर एक संशयित चारचाकी गाडी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्या गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि अन्य वरिष्ठांनी गुन्ह्याचा तपास चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्याकडे सोपविला. त्यांनी तपास पथकाची नियुक्ती केली. पथकाने केलेल्या तपासात अनंत देवळे यांचया घरातून सोनसाखळी, नथ, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. खून होण्यापूर्वी काही दिवस एक तरुण सफेद रंगाची अॅक्टिवा गाडी घेऊन देवळे यांच्या घराची पाहणी करत असल्याचे तसेच त्यांच्या घराबाबत चौकशी करत होता. शिकारीची आवड असल्याने आपण या परिसरात शिकारीसाठी डुक्कर मारून आणल्यास त्याकरिता रात्री काही साहित्य लागल्यास मदत करण्याबाबत त्याने देवळे यांना सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याअनुषंगाने शोध घेत असताना गोपनीय बातमीदारांकडून सागर दिनेश साळवी (२६ वर्षे, जामसूद, मराठवाडी, ता. गुहागर) आणि योगेश मनोहर मेस्त्री (३५, मेढा, ता.मालवण, जि. सिंधुदुर्ग) यांची नावे पुढे आली. त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी कबूल केल्यानुसार त्या दोघांनी अनंत देवळे यांच्या घरी चोरी करण्याच्या हेतूने प्रथम देवळे यांना शिकारीच्या बहाण्याने घराचे बाहेर बोलावले. त्यांना घराच्या पाठीमागे नेऊन ठार मारले आणि त्यांच्या घरातील लोखंडी कपाटातील सोने, चांदीचे दागिने आणि साडेचार हजाराची रोकड लंपास केली.
या चोरीच्या तपासात गुहागर आणि मालवणच्या पोलिसांनी सहकार्य केले.
