लांजा तालुक्यातील गोविळ गुरववाडी येथील घराला अचानक लागलेल्या आगीत घरमालकाचा होरपळून मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यामध्ये आगीचे नेमके कारण अजुनही अस्पष्ट आहे. आगीने घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपुर्ण घर बेचिराख झाले. या घटनेने गोविळ पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दीपक गंगाराम गुरव ( वय- ५२ रा. गोविळ गुरववाडी ) असे त्या घरमालकाचे नाव आहे. गुरव यांना अर्धांगवायूचा आजार असल्याने त्यांना घराबाहेर पळता आले नाही. त्यामुळे बेडवर झोपलेल्या अवस्थेतच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिस रात्री 9.30 च्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले. तत्पुर्वी घराला लागलेल्या आगीमध्ये अडकलेले दीपक गुरव यांना वाचविण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केले. मात्र संपुर्ण घराला आगीने वेढल्याने नागरिकांना घरामध्ये शिरकाव करणे अशक्य बनले होते. काही क्षणातच कौलारू घर आगीमध्ये बेचिराख झाले. दोन वर्षापुर्वी दीपक गुरव हे अर्धांगवायू आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांना जास्त हालचाल करणे कठिण झाले होते.
घरातील अन्य माणसे मुंबईत राहतात. त्यामुळे दीपक गुरव हे घरामध्ये एकटेच रहायचे. मात्र त्यांच्या देखभालीसाठी नातेवाईकांनी गावातीलच एका व्यक्तीला कामाला ठेवल्याचेही समजते. मंगळवारी रात्र होत असल्याने दीपक गुरव नेहमी प्रमाणे घरातील बेडवर झोपले असावेत. दरम्यान 7.45 वाजण्याच्या दरम्यान अचानक घरामध्ये आग लागली असावी व घरात दोन सिलिंडर होते. त्यापैकी आगीने एका सिलेंडरचा स्फोट झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतर सर्वत्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने गुरव यांचे संपुर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले. घर जुने कौलारू, लाकडी वाशांचे होते. त्यामुळे आगीने अधिक पेट घेतला. त्यांच्या घराला आग लागल्याचे दिसताच वाडीतील सर्व नागरिकांनी आरडाओरडा करत दीपक गुरव यांच्या घराकडे धाव घेतली. तोपर्यंत संपुर्ण घराला आगीने वेढले होते.
घराच्या आजुबाजुला दीपक गुरव बाहेर पडले आहेत का याचा नागरीक शोध घेऊ लागले. मात्र घराबाहेर ते कुठेच आढळले नाहीत. मात्र सिलेंडरच्या स्पोटाने घरातील भांडी, कौले, अन्य साहित्य दूरवर अस्ताव्यस्त उडाली होती. आग कमी झाल्यानंतर नागरिकांनी दीपक गुरव यांचा शोध घेतला असता घराच्या एका खोलिमधील बेडवर दीपक गुरव यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. लाकडी बेड व बेडवरील कपड्यांना आगीने पेट घेतल्याने त्यांचा मृतदेह अक्षरशः जळून राख झाला होता. शरीराचे काही अवयव शिल्लक राहिले होते. या घटनेने गोविळ परिसर हादरुन गेला. दीपक गुरव यांच्या मुंबईस्थित असणाऱ्या नातेवाईकांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. बुधवारी सकाळी नातेवाईक गोविळ येथे धाव घेतली.
