ग्राहकांच्या अभावामुळे एपीएमसी मार्केटमधील आंब्याचे दर गडगडले

0

रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला असल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा बाजारात विक्रीला येऊ लागला आहे. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये ४० ते ४५ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. कोरोनामुळे कडक संचारबंदी असल्याने ग्राहकांचा फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने दर मात्र गडगडले आहेत.

ऋतुचक्रातील बदलामुळे आंबा पीक दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. मुंबई उपनगरात दहा हजारपेक्षा अधिक किरकोळ व्यापारी, तर वाशी मार्केटमध्ये ६०० घाऊक व्यापारी आहेत. वाशी येथून हापूस खरेदी करून उपनगरातून विकण्यात येतो. बहुतांश शेतकरी वाशी मार्केटवर अवलंबून आहेत. मात्र गेल्या पाच – सहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी हापूसच्या उत्पादनावर कमालीचा फरक पडला आहे. सध्या ४० ते ४५ हजार पेट्या वाशी मार्केटमध्ये कोकणातून विक्रीला पाठविण्यात येत आहेत. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी सकाळ व दुपारच्या सत्रात आंबा विक्री सुरू आहे. मात्र संचारबंदीमुळे ग्राहकांचा प्रतिसाद फारसा लाभत नाही. त्यामुळे दरावर परिणाम झाला आहे. गत आठवड्यापेक्षा दोन हजाराने दर गडगडले आहेत. एक हजार ते २५०० रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. उत्पादन कमी असल्याने दर अद्याप टिकून होते. महागाईमुळे आंबा उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. मात्र आता संचारबंदीमुळे दर गडगडल्याने उत्पादन खर्च वसूल होणे अवघड बनले आहे. खासगी विक्रेते जाग्यावर २५०० ते ३००० रुपये दराने पेट्या खरेदी करीत असल्याने हमाली, वाहतूक खर्च वाचत असल्याने स्थानिक विक्री परवडत आहे.
कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथून केसर, बदामी, लालबाग, तोतापुरी, कर्नाटक हापूसची आवक सुरू आहे. केसर सध्या १०० ते १२० रुपये किलो, बदामी ५० ते ६० रुपये किलो, लालबाग ६० ते ७० रुपये किलो, तोतापुरी ३० ते ५० रुपये किलो, कर्नाटक हापूस १०० ते १५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:43 AM 22-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here