शिवसेनेनेच जनादेशचा अपमान केला, मुख्यमंत्री पदावरून कोणतेच आश्वासन दिले नव्हते : अमित शाह

0

महाराष्ट्रातील राजकीय उलथा-पालथीनंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राजकीय घटनाक्रमावर भाष्य केले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद मोदींच्या नावावर निवडणूक लढवून, भाजपशी युती करून शिवसेना आता काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापित करीत असल्यामुळे जनादेशाचा अनादर कोण करीत आहे हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री पदावर शिवसेना खोटं बोलत असून कधीही मुख्यमंत्री पदाच्या समान मागणीवर कोणतेच आश्वासन कधीच देण्यात आले नव्हते असे शाह यांनी सांगितले.

HTML tutorial

शाह म्हणाले ” सुरवातीपासून देवेंद्र फडणवीसच भाजप-सेना युतीचे मुख्यमंत्रीपदाचे अधिकृत उमेदवार होते, विधानसभा निवडणुकीत मी आणि पंतप्रधान नरेंद मोदींनी अनेक सभांमध्ये याचा उल्लेख केला तेव्हा कोणी काही म्हटले नाही आणि अचानक निकाल लागल्यानंतर शिवसेनेने ही मागणी करण्यास सुरवात केली याचा मला अर्थ लागत नाही. “

वैचारिक बांधिलकी सोडून सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे शपथ घेत नसून त्यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी शी जणू सौदाच केला असून यापेक्षा अजून कोणता मोठा घोडेबाजार हवा अशा शब्दात त्यांनी शिवसेनेला लक्ष केले आहे. केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले की, विचारधारेवर बोलणाऱ्या शिवसेनेला राम मंदिराचा देखील विसर पडला असून उद्धव ठाकरे अयोध्याला जाणार होते पण राजकीय फायदा दिसत असल्याने ते गेले नाहीत असा टोमणे देखील त्यांनी लगावला.

अजित पवार यांचा शपथविधी आणि राजीनामा नाट्यावर बोलताना शाह म्हणाले की, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते होते. ते स्वतः आमच्याकडे समर्थन घेऊन आले म्हणून आम्ही सरकार स्थापन केली. परंतु ते बहुमताचा आकडा जमवू न शकल्यामुळे कोणताही घोडेबाजार न करता आम्ही सत्ता-सोडली यात काय वैचारिक चुक केली असा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्याशी संबंधित भ्रष्टाचाराच्या कोणत्याही प्रकरणातील चौकशी बंद करण्यात आली नसून हा अपप्रचार माध्यमांनी केला आहे. शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एक होऊन सरकार स्थापन करू शकतात तेव्हा नैतिक प्रश्न उदभवत नाही परंतु सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपने सरकार स्थापन करण्याचा प्रयन्त केला तर माध्यम वेगळा निकष लावता याबाबत शाह यांनी नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्रानंतर भाजप विरोधी राजकारणावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि भाजप रोखण्यासाठी अनेक प्रयत्न झाले . शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडी या त्यातलाच प्रकार असून आम्ही हे आव्हान पेलण्यास समर्थ आणि सक्षम असून सामान्य जनता सगळं उघड्या डोळ्यांनी बघते आहे. भाजप-सेनेला बहुमत असूनही मुख्यमंत्री पदावरून उगाच वाद निर्माण करून शिवसेनेनेच जनादेशचा अपमान केल्याचा पुनरोच्चार शाह यांनी केला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 पैकी भाजपला 105 तर शिवसेनेला 56 राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसने 44 जागांवर कब्जा मिळवला. शनिवारी देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उप- मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अजित पवार यांनी उप-मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे आणि बहुमताचा अभाव असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here