रत्नागिरी शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरींच्या घटनेत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून गस्त घालण्यास सुरू आहे. यादरम्यान पोलिसांनी नाचणे रोडवर संशयास्पद वावरणार्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता रत्नागिरी शहर परिसरात अनेक दुचाकी व सायकल चोरी केल्याची माहिती उघड झाली. यावेळी त्यांच्याकडून 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
यश राजकुमार शर्मा (19, रा. घुडेवठार, रत्नागिरी), सुरज सुरेश सकपाळ, (19, रा. तेली आळी, रत्नागिरी), विघ्नेश देंवेद्र भाटकर, (19, रा. तोणदे, भंडारवाडी, रत्नागिरी) अशी या ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यात एका बालकाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून सहा दुचाकी, 2 सायकल तसेच 2 मोबाईल असा किंमती मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शहरात सध्या दुचाकी चोरीचे तसेच घरफोडी, चोरीचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारांना प्रतिबंध होण्यासाठी व ते गुन्हे उघडकीस येण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून गस्त घालण्यास सुरूवात केली असता ही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने, पांडुरंग गोरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत बोरकर, संदीप कोळंबेकर, संजय कांबळे आदींनी ही कारवाई केली.
