रत्नागिरीच्या सैन्यभरतीत साडेचार हजार उमेदवारांची निवड

0

रत्नागिरीत दहा दिवस चाललेल्या सैन्यभरतीमध्ये चार हजार ४४५ उमेदवारांची पुढच्या चाचणीसाठी निवड झाली आहे, अशी माहिती मेजर जनरल व्ही. के. एच. पिंगळे यांनी आज येथे पत्रकारांना दिली.

HTML tutorial

गेल्या १७ नोव्हेंबरपासून रत्नागिरीच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सुरू असलेल्या सैन्यभरतीचा आज समारोप झाला. त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा हे जिल्हे तसेच गोव्यातील उमेदवारांनी सहभाग घेतला. आज भरती शिबिराचा समारोप झाला. त्यानिमित्ताने श्री. पिंगळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, रत्नागिरीतील सैन्यभरतीमध्ये सामाजिक संस्था, प्रशासन, पोलीस खाते तसेच स्थानिक नागरिकांकडून चांगले सहकार्य मिळाले.

रत्नागिरीत ६० हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामधील प्रत्यक्षात भरतीसाठी मैदानावर सुमारे ४८ हजार उमेदवारांनी सहभाग घेतला. दररोज सुमारे पाच हजार उमेदवारांची चाचणी होत होती. या भरती प्रक्रियेमधून चार हजार ४४५ उमेदवार उत्तीर्ण झाले असून कोल्हापूर येथे येत्या १९ जानेवारीला होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी ते पात्र ठरले आहेत. सैन्यात भरती होत असताना एका सैनिकाच्या तीन पिढ्यांना त्याचा फायदा होतो. त्याच्या सेवानिवृत्तीनंतरही समाजाला एक शिस्तबद्ध असा नागरिक मिळतो, असे मेजर जनरल पिंगळे यांनी सांगितले.

भरती प्रक्रियेमध्ये लष्कराच्या २०० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. शारीरिकदृष्ट्या चांगल्यात चांगला उमेदवार निवडला जावा यासाठी एका उमेदवाराची तीन डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. येत्या १९ जानेवारीला होणाऱ्या लेखी परिक्षेसाठीही प्रत्येक पदासाठी वेगवेगळी प्रश्नपत्रिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील सैन्यभरतीचे प्रमाण मागील कालावधीशी तुलना करता कमी होत आहे. ते वाढविण्यासाठी या भागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, तसेच भरतीसंदर्भात जाणीव जागृती आणि सातारा, सांगली, कोल्हापूर सारखे कोचिंग क्लासेस सुरू करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.सैन्य भरती प्रक्रियेत मोलाचे सहकार्य केल्याबद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमांचे त्यांनी आभार मानले. यावेळी कर्नल अनुराग सक्सेना, प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दत्ता भडकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here