जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांवरच भर द्यावा : निलेश राणे

0

रत्नागिरी : जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोरोनासाठी रॅपिड अँटीजेन चाचण्या करून लोकांना घाबरवून सोडण्यापेक्षा आरटी-पीसीआर चाचण्यांवर भर द्यावा, अशी सूचना माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी केली आहे. ते म्हणाले, अँटिजेन चाचणीमधून चुकीचा अहवाल येण्याची शक्यता आहे. त्या टेस्ट सरसकट जिल्ह्यात करण्यापेक्षा खात्रीशीर असलेल्या आरटी-पीसीआर टेस्टच केल्या जाव्यात. सरसकट सर्वांच्याच रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या गेल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून सर्वसामान्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शांत डोक्याने विचार करून आरटी-पीसीआर चाचण्यांवरच भर द्यावा. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण आणि जनतेतील भीती कमी होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांत अचानक करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून सर्वाधिक रुग्णसंख्या रॅपिड अँटीजेन टेस्टमधील असल्याचे दिसून आले आहे. मुळात करोनासाठी तीन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. एक आरटी-पीसीआर, दुसरी अँटीजेन आणि तिसरी अँटीबॉडी टेस्ट. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेही सुरुवातीपासून कोव्हिडच्या चाचण्यांसंबंधी नियम बनवून दिले. आरटी-पीसीआर टेस्ट म्हणजे Real Time Reverse Tranion Polymerase Chain Reaction. त्यालाच स्वॅब टेस्ट म्हटले जाते. आरटी-पीसीआर टेस्ट ही करोनाचा संसर्ग झालाय की नाही, हे खात्रीशीर पद्धतीने सांगू शकते. आयसीएमआरने या चाचणीला टेस्टिंगचा गोल्ड स्टँडर्ड असे म्हटले आहे. शरीरात करोनाचा संसर्ग कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात असला तरी तो या टेस्टमार्फत कळू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यात आरटी-पीसीआरसाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली यंत्रणा असताना ती पूर्ण क्षमतेने वापरावी, असे श्री. राणे यांनी सांगितले. रॅपिड अँटीजेन टेस्टमधून फॉल्स निगेटिव्ह म्हणजे चुकीचा, नकारात्मक रिझल्ट येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अँटीजेनमध्ये निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीची आरटी-पीसीआर चाचणीसुद्धा करवून घ्यावी, असे आयसीएमआरने सांगितले आहे. अशा परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात नाहक सरसकट अँटीजेन टेस्ट होत आहेत. जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालात एकूण बाधितांची संख्या ५१३ एवढी होती. त्यात ३४४ रुग्ण अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले. याशिवाय निगेटिव्ह रुग्णांची संख्या खूप आहे. या अँटीजेन चाचणीमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला असून जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून आरटी-पीसीआर चाचणी वाढवली पाहिजे. त्यामुळे ताणदेखील कमी होईल आणि जिल्ह्यातील सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली घबराट दूर होईल, असेही श्री. राणे यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:06 AM 26-Apr-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here