मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि आई वडिलांना स्मरुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा सुरु झाला. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यासारख्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हजारो जण उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर राष्ट्रवादी तर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत शपथ घेतली.
उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीने या सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी शपथ घेतली. मग राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी तर नंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली. काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या शपथविधीने सांगता झाली.
या शपथविधीसाठी देशभरातून मान्यवर आले होते. यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते उद्धव ठाकरे यांचे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. राज ठाकरे हे सहकुटुंब आले होते.
