शिवतीर्थावर घुमला, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे. आवाज

0

मुंबई: प्रबोधनकारांनी ज्या शिवतीर्थावर या महाराष्ट्राला ठाकरे कुटुंबाचा बाळ अर्पण करत असल्याचे जाहिर केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ‘एक नेता, एक मैदान’ असा इतिहास रचत ज्या शिवतीर्थावर अव्याहतपणे मुलुख मैदान तोफ धडाडली. ज्या शिवतीर्थावरून शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्राला उद्धव आणि आदित्यला सांभाळा अशी आयुष्याच्या संध्याकाळी भावनिक साद घातली. महाराष्ट्राचे महानेते बाळासाहेब ठाकरे यांना ज्या शिवतीर्थावर अंतिम निरोप देण्यात आला. त्याच शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. शपथ घेण्याआधी उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरच्या शिवाजी महारांजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नमस्कार केला. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांना आणि आई वडिलांना स्मरून शपथ घेतली.

त्यांना पद आणि गोपनीयतेची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शपथ दिली. हा ऐतिहासिक सोहळा हजारो लोकांच्या साक्षीने पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मनसे प्रमुख राज ठाकरे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here