रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई पुलावरून राजेश गोजीम हा उंबरे येथे राहणारा तरूण नदीपात्रात पडला. ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुरात या पुलाचे कठड्यांची मोडतोड झाली होती परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्या चार महिन्यात कोणतीही दुरूस्ती न केल्याने हा अपघाताचा प्रसंग घडला. सुदैवाने राजेश गोजीम हा उंचावरून पडूनही वाचला आहे. मात्र त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर औषधोपचार चालू आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने युद्धपातळीवर या पुलाच्या कठड्याची दुरूस्ती न केल्यास उपअभियंत्यांना घेराव घालू असा सज्जड इशारा भाजपचे नेते व चांदेराईचे माजी सरपंच दादा दळी यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम खाते आणखी कोणती मोठी घटना घडण्याची वाट पहात आहे का? असाही संतप्त सवाल नागरिकांच्यात विचारला जात आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या डेप्युटी इंजिनिअर पुजारी यांना ही घटना लक्षात आणून दिल्यावर व घेराव घालण्याचा इशारा दिल्यावर त्यांनी या पुलाला तात्पुरते बांबूचे कठडे घालून देतो असे आश्वासन दिले आहे. मात्र या पुलाची तातडीने दुरूस्ती करून पक्के कठडे बांधावेत अशी नागरिकांची मागणी आहे.
