मुंबई: राज्यात स्थापन झालेल्या सरकारला घेरण्यासाठी भाजपानं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत शिवसेनेवर काल पहिला बाण सोडला. देवेंद्र फडणवीस भाजपाचे विधिमंडळातील गटनेते असल्यानं त्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा असेल. त्यामुळे विधानसभेत शिवसेनेसमोर मोठं आव्हान असेल. यासोबतच विधानपरिषदेतही शिवसेनेच्या अडचणी वाढवण्याची तयारी भाजपानं सुरू केली आहे.
शिवसेनेवर कायम तोंडसुख घेणारे आणि ठाकरे कुटुंबावर नेहमी तुटून पडणारे नारायण राणे यांना विधानपरिषदेत आणण्याच्या दृष्टीनं भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी दिल्लीतील भाजपा नेत्यांशी संपर्कदेखील साधण्यात आला आहे. कधीकाळी कडवे शिवसैनिक राहिलेले नारायण राणे आता ठाकरे कुटुंबाचे कडवे टीकाकार मानले जातात. भाजपाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त टीका राणे कुटुंबाकडून ठाकरेंवर केली जाते. त्यामुळेच त्यांना विधानपरिषदेत आणून शिवसेनेसमोर अडचणी निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे कणकवलीतून विजयी झाल्यानं ते विधानसभेत दिसतील. त्यामुळे शिवसेनेला अंगावर घेताना फडणवीस यांना नितेश राणेंची साथ मिळेल. मात्र विधानपरिषदेत भाजपाकडे मोठा चेहरा नाही. त्यामुळेच नारायण राणेंना विधानपरिषदेत आणण्यासाठी भाजपानं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या राणे राज्यसभेचे सदस्य आहेत. ते विधानपरिषदेत आल्यास दोन्ही सभागृहांमध्ये सरकारची आणि विशेषत: शिवसेनेची कोंडी करता येऊ शकते, असं भाजपामधील नेत्यांना वाटतं. राणे विधानपरिषदेत आल्यास वारंवार ठाकरे विरुद्ध राणे संघर्ष पाहायला मिळू शकतो.
