मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हजारोंच्या जनसमुदायासमोर शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आज ते मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेणार आहेत. त्यामुळे मंत्रालयातील त्यांच्या केबिनबाहेर ‘मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी पाटी लावण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता मंत्रालयात जाणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मंत्रालयाच्या दरवाजाबाहेर फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यांचे केबिनही सजवण्यात आले असून त्यांच्या नावाची पाटी दरवाजावर लावण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे महाराष्ट्र विकास आघाडीचं नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काल शपथ घेतली. 20 वर्षानंतर महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री लाभला असून उद्धव ठाकरे सैनेचे तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत.
दरम्यान, शिवसेनेनं भाजपसोबत युती करत विधानसभा लढवली होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरुन भाजप-सेनेमध्ये बिनसलं. उद्धव ठाकरे यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. आघाडीच्या मदतीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहे.
