आकाशवाणी शास्त्रीय गायन स्पर्धेत रत्नागिरीचा चैतन्य परब देशात दुसरा

0

रत्नागिरी : प्रसार भारती आकाशवाणीतर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत (ख्याल गायन) विभागात रत्नागिरीच्या चैतन्य विराज परब याने देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेतील यशामुळे चैतन्यला आकाशवाणीची बी ग्रेड कलाकार श्रेणी थेट प्राप्त झाली आहे.

HTML tutorial

आकाशवाणीतर्फे दरवर्षी संगीताच्या विविध प्रकारात स्पर्धा घेतल्या जातात. युवा कलाकाराला प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धांचे देशपातळीवरील आयोजन केले जाते. ही स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा दोन टप्प्यांत होते. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रात झालेल्या प्राथमिक फेरीत यशस्वी झाल्याने चैतन्य परबची दिल्लीतील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. या अंतिम फेरीसाठी देशभरातील विविध केंद्रांमधून स्पर्धकांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या. तज्ज्ञ परीक्षक मंडळाने शास्त्रीय संगीत (ख्याल गायन) मुलांच्या गटात दिल्लीच्या पुलकित शर्मा याला प्रथम, तर रत्नागिरीच्या चैतन्य परबला द्वितीय क्रमांक बहाल केला.

चैतन्यचे संगीताचे सुरुवातीचे शिक्षण त्याची आई सौ. विनया विराज परब यांच्याकडे झाले. गेली चार वर्षे तो किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडे शास्त्रीय गायनाची तालीम घेत आहे. चैतन्यने सहाव्या वर्षी अखिल भारतीय गांधर्व मंडळ गायनाची पहिली परीक्षा दिली. तसेच तो मंडळाची हार्मोनियम मध्यमा प्रथम परीक्षाही उत्तीर्ण झाला आहे. सध्या तो गायनाची उपांत्य विशारद ही परीक्षा देत आहे. त्याने अनेक स्पर्धांमधून यश मिळविले आहे. चैतन्य परब रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ विद्यालयात शिकत आहे.

त्याला नवी दिल्लीतील आकाशवाणीच्या रंगभवनात येत्या १७ डिसेंबर रोजी पारितोषिकाचे वितरण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here