रत्नागिरी (प्रतिनिधी) : मैत्रिणीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ५४ हजारांचा ऐवज घेऊन पलायन करणाऱ्या महिलेस न्यायालयाने २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही घटना २०१८ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत घडली होती. कल्पना रमेश राठोड (३८, सध्या रा.खेडशी मूळ रा.कर्नाटक) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात जान्हवी जयंत शिंदे (४०, रा. पानवल,रत्नागिरी) यांनी सोमवारी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, जान्हवी यांची कल्पना ही मैत्रीण होती. यातूनच त्यांनी विश्वासाने आपल्याकडील रोख ३ लाख २० हजार रुपये आणि ३४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज ठेवण्यास दिला होता. परंतु काही दिवसांपूर्वी कल्पनाने जान्हवीला तिचे पैसे आणि दागिने परत न करताच ती आपल्या मूळ गावी कर्नाटक येथे निघून गेली. ही बाब जेव्हा जान्हवी यांना समजली तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी कल्पनाला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता तिला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
