खेड : तालुक्यातील शिर्शी मोहल्ला येथे गुरुवारी (ता. २९) सकाळी आठला नवविवाहितेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिर्शी गावातील नाझनीन वासिफ हमदुले (वय २४) ही नवविवाहिता गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घरात तीक्ष्ण हत्यार पोटात लागल्याने गंभीर जखमी झाली. तिला नातेवाईकांनी खेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली. सायंकाळी उशिरा खेडच्या पोलिसांनी शिर्शी गावात भेट दिली असून अधिक तपास सुरू आहे. नवविवाहितेच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
