आ. नीतेश राणे यांनी कणकवलीकरांची केली फसवणूक

0

कणकवली : गेल्या साडेचार वर्षांत अनेक फसव्या योजना जाहीर करून आ. नीतेश राणे यांनी कणकवलीकरांची फसवणूक केली आहे. आता त्यापुढे जाऊन नगरपंचायतीचे सत्ताधारीही शहरवासीयांची फसवणूक करत आहेत. यापूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्याला ‘पोपट’ म्हणून हिणवणारे आ. नितेश राणे आणि नगरपंचायत सत्ताधारी स्वतःच पोपट झाले आहेत. आ. राणे आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यात कणकवलीकरांना फसवण्याची स्पर्धाच लागली आहे, अशी बोचरी टीका माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक सुशांत नाईक आणि रुपेश नार्वेकर यांनी केली. 
इंडियन ऑईल कंपनीच्या सीएसआरमधून 95 लाखांचा निधी कणकवली न.पं.ला विविध विकासकामांसाठी मंजूर झाला आहे, असे सांगून एका भामट्याने न. पं. ची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सत्ताधार्‍यांनीच त्याची कबुली दिल्यानंतर भाजप-शिवसेनेच्या विरोधी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल केला.  नगरसेविका सौ. मेघा सावंत, सौ. माही परूळेकर, सौ.मानसी मुंज, सौ. सुमेधा अंधारी, भूषण परूळेकर, महेश सावंत, प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते. सुशांत नाईक म्हणाले, आ. राणे यांनी गेल्या साडेचार वर्षात ‘औषध आपल्या दारी, वाय-फाय सेवा, बोटींग प्रकल्प, सीसीटीव्ही, भटके कुत्रे पकड मोहीम, सिंधुदुर्ग गाईड’ अशा एप्रिल फूल करणार्‍या योजना जाहीर केल्या. त्या कधी बंद पडल्या ते कोणालाच समजले नाही. आता तर नगरपंचायतीच्या सत्ताधार्‍यांनी स्वतःचाच पोपट झाल्याचे स्वतःच जाहीर केले आहे. आ. राणेंप्रमाणेच न. पं. सत्ताधार्‍यांकडून फसव्या योजना जाहीर केल्या जात आहे. एजी डॉटर्सचा 900 कोटीचा कचरा प्रक्रिया प्रकल्प ही सुद्धा  कणकवलीवासीयांची फसवणूक आहे. आतापर्यंत तोतया पोलिस किंवा तोतया अधिकारी बनून जनतेची फसवणूक करण्याचे प्रकार होत होते, परंतु  न. पं. सारख्या स्वायत्त संस्थेची फसवणूक झाल्याचा हा  पहिलाच प्रकार असल्याचे सुशांत नाईक म्हणाले. कन्हैया पारकर म्हणाले, 19 जुलै रोजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी न. पं. च्या विशेष बैठकीत मोठ्या आवेशात 4 जुलैला इंडियन ऑईल कंपनीने सीएसआरमधून न. पं. ला सुमारे 1 कोटीचा निधी मंजूर केल्याचा मेल केला आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे असे सांगितले. फक्त कणकवली, देवगडसाठीच ही योजना आम्ही आणली आहे, असे ते वारंवार सांगत होते. मात्र उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी आपण यामध्ये फसल्याचे गुरुवारी मान्य केले आहे. यांच्याकडून कणकवलीकरांची फसवणूक करण्याची स्पर्धाच लागली आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे 900 कोटीचा एजी डॉटर्सचा कचरा प्रकल्प. जर हा कचरा प्रकल्प होत असेल तर गारबेज डेपोसाठी निविदा कशासाठी? या निविदा रद्द करा आणि प्रकल्प करून दाखवा असे आमचे आव्हान आहे. न. पं. प्रशासनाला विश्वासात न घेता किंवा परवानगी न घेता इंटरनॅशनल स्कूलच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. तेथील अनधिकृत बांधकामाला न. पं. ने नोटीस दिली आहे. ही कणकवलीकरांची फसवणूक नाही का? असा सवाल  कन्हैया पारकर यांनी केला. 
सीएसआरमधील कामांचा प्रस्ताव सादर करावा. निधी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे कन्हैया पारकर म्हणाले. फसवणूक करणार्‍या भामट्याची कायदेशीर चौकशी व्हायला हवी. यात नगराध्यक्ष आणि इतर नगरसेवकांचा काही हात आहे का? याची चौकशीची मागणी आम्ही जिल्हाधिकार्‍यांकडे करणार आहोत. ऐन मुहूर्तावर नवरी गायब ज्या पध्दतीने नगराध्यक्षांनी सीएसआर निधी वितरणाबाबत मोठ्या आवेशात बैठक घेतली तो प्रकार म्हणजे ऐन मुहूर्तावर नवरीच गायब झाली आणि सत्ताधार्‍यांचे हसे झाले, अशी टीका रुपेश नार्वेकर यांनी केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here