मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 169 मतं पडली तर विरोधात एकही मत नव्हतं. भाजपने आधीच सभात्याग केला होता, तर मनसे (1), माकप (1), MIM (2) असे एकूण 4 आमदार तटस्थ राहिले. त्यापूर्वी, सरकारची बहुमत चाचणी जोरदार गोंधळाने सुरू झाली. हे अधिवेशन आणि मुख्यमंत्र्यांची शपथ नियमबाह्य असल्याचं सांगत मात्र विरोधी पक्ष भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि हंगामी अध्यक्षांवर हल्लाबोल केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला सभागृहात आपलं बहुमत सिद्ध करावी लागण्याची प्रक्रिया जरा काळ लांबली. मात्र त्यानंतर आधी आवाजी मतदान आणि नंतर शिरगणतीने मतदान घेण्यात आलं.
