संस्था आणि शाळेमधील दूवा म्हणजे लिपीक – सुधाकर नारकर

0

संगमेश्वर :- शालेय व्यवस्थापन चालवत असतांना शाळा आणि संस्था यांच्या मधील महत्वाचा दूवा असतो तो म्हणजे लिपीक. गेली २४ वर्षे व्यापारी पैसा फंड संस्थेत काम करणाऱ्या कुमार पाष्टे यांनी आपल्या कामकाजाच्या जबाबदारीसह संस्थेचेही कामकाज पाहून व्यवस्थापना मधील दूवा बनण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. यामुळेच आज शाळा आणि संस्था त्यांना एकत्रितपणे दूवा देत असल्याचे प्रतिपादन व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष सुधाकर नारकर यांनी केले.
पैसा फंड इंग्लिश स्कूल मधील वरिष्ठ लिपीक कुमार शांताराम पाष्टे हे आपल्या २४ वर्षांच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले . यावेळी संस्था आणि प्रशालेतर्फे आयोजित निरोप समारंभात सुधाकर नारकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष अभय गद्रे, सचिव धनंजय शेट्ये , सहसचिव अनिल शिंदे, सदस्य किशोर पाथरे , जगदीश शेट्ये , संस्था हितचिंतक संदीप सुर्वे , रमेश झगडे , व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद भिंगार्डे , यशवंत सैतवडेकर , सुशांत कोळवणकर , प्रमोद शेट्ये ,बाळा पाथरे , माजी मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण , मुख्याध्यापिका नेहा संसारे , ज्येष्ठ शिक्षक कालिदास मांगलेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका नेहा संसारे यांनी आपल्या मनोगतात कुमार पाष्टे यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांची तत्परतेने काम करण्याची पध्दत अभिनंदनीय असल्याचे नमूद केले. आज जरी पाष्टे सेवानिवृत्त होत असले तरी , त्यांनी शाळेसाठी आवश्यक असणारे सहकार्य भविष्यातही करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उमा दामले , माधवी बेंडके , कालिदास मांगलेकर , मनोज जाधव , माजी मुख्याध्यापक अनिल शिंदे आदींनी आपली मनोगते व्यक्त करुन पाष्टे यांच्या कामाचा आढावा घेतला. संस्था उपाध्यक्ष अभय गद्रे यांनी कुमार पाष्टे हे एक बहुआयामी व्यक्तीमत्व असल्याचे सांगून ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असले तरीही शाळा आणि संस्थेला त्यांच्या सहकार्याची भविष्यातही गरज असल्याने त्यांनी आवश्यक ते सहकार्य करत रहावे असे आवाहन केले.
संस्थाध्यक्ष सुधाकर नारकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि चांदीची गणेशमूर्ती देवून पाष्टे यांचा सत्कार करण्यात आला. व्यापारी संघ संगमेश्वरतर्फे अध्यक्ष प्रमोद भिंगार्डे यांच्या हस्ते भेटवस्तू शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. शिक्षकेतर संघटनेतर्फे किशोर चांदे ,अमोल लिंगायत , जाधव यांच्या हस्ते भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देवून पाष्टे यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेतर्फे मुख्याध्यापिका नेहा संसारे यांच्या हस्ते भेटवस्तू , शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून पाष्टे यांना सन्मानित करण्यात आले. उमा दामले यांच्या हस्ते सौ.मिनल कुमार पाष्टे यांना भेटवस्तू देवून त्यांनाही सन्मानित करण्यात आले.
निवृतीपर मनोगत व्यक्त करतांना कुमार पाष्टे संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रवींद्र शेट्ये यांच्या आठवणीने भावूक झाले. आपल्या २४ वर्षांच्या सेवेत आपण आपल्या पदाला न्याय देत प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. सद्यस्थितीत पदभरती बंद असल्याने कामाचा ताण खूप मोठा आहे भविष्यातही आपण शाळा आणि संस्थेला सहकार्य करत राहू असे अभिवचन देवून पाष्टे यांनी व्यापारी पैसा फंड संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपली सेवा शिक्षण विभागातील अधिकारी – कर्मचारी , संस्था , मुख्याध्यापक , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी , पालक , व्यापारी वर्ग आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळेच यशस्वी झाली त्यामुळे यासर्वांसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करतो असे आवर्जून नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी तर आभारप्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक कालिदास मांगलेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here