सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांना तडकाफडकी पदावरून हटविण्यात आले आहे. त्यांना प्रदेश सरचिटणीस पदावर बढतीपर नियुक्ती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयामुळे सुरेश गवस कमालीचे दुखावले गेले असून पक्षत्यागाचा इशारा त्यांनी दिला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन दोन तासाची मुदत प्रदेशाध्यक्षांना देऊन समर्पक उत्तर न आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करणार अशी भूमिका सुरेश गवस यांनी मांडली आहे. पक्षाने जिल्हाध्यक्ष पदावरून प्रदेश सरचिटणीस पद दिले. ही बढती मला मान्य नाही, असे गवस यांनी यावेळी सांगितले. त्यांना जिल्हाध्यक्ष पदावरून बढती दिल्याप्रकरणी विचारणा केली असता ते म्हणाले, या प्रकारामागे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा हात आहे. त्यांना जिल्हाध्यक्ष पद हवे आहे असा आरोप करून पक्षनिष्ठेला किंमत नाही. त्यामुळे आम्ही पक्ष सोडणार आहोत. ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रवीण भोसले आणि कार्याध्यक्ष म्हणून अबिद नाईक यांचा या पदावर डोळा आहे. त्यामुळे त्यांनी हे कुभांड रचले असल्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष गवस यांनी सांगितले. त्यांना याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे. पक्षाच्या मते ही बढती असली तरी हा सर्व प्रकार म्हणजे हकालपट्टी आहे, असा आरोप गवस यांनी केला आहे. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात म्हणावे तसे काम झाले नाही असे सांगून भोसलेंनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. त्याला काही लोकांनी खतपाणी घातले. त्यामुळे हा सर्व प्रकार घडला आहे, असा आरोप गवस यांनी केला आहे. सद्यस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीत पक्षनिष्ठेला किंमत नाही. त्यामुळे उद्या शनिवारी 27 जुलै रोजी कुडाळ येथे पत्रकारांसमोर जाहीर भूमिका मांडून आम्ही राष्ट्रवादीला रामराम करण्याबाबत निर्णय घेणार आहोत, असा इशारा त्यांनी बोलताना दिला. गवस हे शरद पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. राष्ट्रवादीच्या पडत्या काळात त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती. परंतु त्यांच्या नेमणुकीमुळे भोसलेंसह एक गट नाराज होता. त्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
