उन्नाव
हैदराबाद, बिहार येथील घटनेनंतर पुन्हा एकदा बलात्काराची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील बलात्कार पीडितेला आरोपींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडिता गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानकावर निघाली होती. तिला रायबरेलीला जायचे होते. त्यावेळीच आरोपींनी तिला थांबवले आणि तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यात पीडिता 80 टक्के भाजली आहे.
या घटनेनंतर संबंधित पीडितेला आधी उन्नावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला कानपूरमध्ये हलविण्यात आले. पीडिते तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, एकूण सहा जणांनी तिच्यावर हल्ला केला. आधी तिच्या डोक्यावर मारण्यात आले. त्यानंतर चाकूच्या साह्याने तिच्या गळ्याजवळ वार करण्यात आले. त्यानंतर काही जणांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून दिले. या घटनेनंतर जवळपास असलेले काही लोक धावत पीडितेच्या मदतीला आले. इतर लोक येत असल्याचे बघितल्यावर आरोपी तेथून पळून गेले. स्थानिकांनी लगेचच पोलिसांना याबद्दल माहिती दिली. उन्नावचे पोलिस अधीक्षक विक्रांत वीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर लगेचच पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, अन्य तिघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत. पीडित तरुणीने मार्च 2019 मध्ये या आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पीडितेला जाळल्यानंतर तिचा आरडाओरड ऐकून लोक धावून येत असल्याचे पाहून आरोपींनी तेथून पलायन केले. यापूर्वी याच सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच डीएम देवेंद्र पांडे, एसपी विक्रांत वीर यांच्यासह अनेक पोलिस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीडितेने 5 आरोपींची नावे दिली आहेत. यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांचीही चौकशी केली जात आहे. इतर दोघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती उन्नावच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. ही घटना घडल्यानंतर तत्काळ पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे. पालिसांनी आरोपींच्या घरांवर छापेमारी केल्यानंतर हे सर्व आरोपी आपापल्या कुटुंबीयांसोबत आपल्या घरातच होते. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेशी संबंधित धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून त्याआधारे पोलीसांचा तपास सुरू आहे.
