मुंबई, कोकणातील कोरोनायोद्ध्यांच्या पाल्यांना शैक्षणिक, वसतिगृह शुल्क माफ

0

रत्नागिरी : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील रुग्णालये, पोलीस दल नगरपालिका, महापालिकेत कोरोनायोद्धे म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी मोफत शिक्षण शुल्क आणि मोफत वसतिगृह शुल्क योजना यावर्षीही राबविण्यात येणार आहे. देवरूख येथील प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने यांनी ही घोषणा केली. कोरोना महामारीच्या कालावधीत देवरूख येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था भरीव मदत करत आहे. संस्थाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पुढाकारातून संगमेश्वर तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा आणि करोना रुग्णांना विविध प्रकारे सहकार्य करण्यात येत आहे. कोरोनाची भीषणता लक्षात घेऊन मुंबईसह कोकणातील कोरोनायोद्ध्यांची जी मुले संस्थेच्या आंबव येथील अभियांत्रिकी महाविद्यलयात शिक्षण घेत आहेत, त्यांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय संस्थेने गेल्या वर्षी घेतला होता. यावर्षीही त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे श्री. माने यांनी जाहीर केले आहे. या योजनेचा संबंधितानी लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी केले आहे. देवरूख येथे करोनाबाधितांसाठी नव्याने ३५० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. याकरिता रवींद्र माने यांनी २५० बेड्स उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या वर्षी संस्थेने आपली साडवली येथील स्व. मीनाताई ठाकरे हायस्कूलची इमारत उपलब्ध करून दिली होती. या इमारतीमध्ये तालुक्याच्या आरोग्य विभागाचे रुग्ण विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले होते. आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी विलगीकरण केंद्रासाठी आरएफ द्वारा नियंत्रित कार्टची निर्मिती केली. विलगीकरण केंद्रामध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णाची देखरेख करताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. मात्र रुग्णाशी येणारा थेट संपर्क त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारा असतो. याच अनुषंगाने महाविद्यालयात अभियांत्रिकी ज्ञान आणि उत्पादन सुविधा वापरून कार्ट बनविण्यात आल्या. जिल्हाधिकारी लक्षीनारायण मिश्रा आणि संगमेश्वर तहसीलदार सुहास थोरात यांच्याकडे त्या सुपूर्द करण्यात आल्या. त्यांचा रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण (कामथे), खेड (कळंबणी), दापोली या ठिकाणच्या शासकीय रुग्णालये व विलगीकरण केंद्रात वापर करण्यात येत आहे. ही एक बॅटरीवर चालणारी कार्ट असून त्याद्वारे २०० मीटरपेक्षा अधिक अंतर आणि जवळपास ८० किलोपर्यंतच्या वजनाच्या सामग्रीची ने-आण करणे शक्य होत आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात संस्थेने कोविड – १९ योद्धा सन्मान शिक्षण योजना आंबव येथील अभियांत्रिकी पदवी महाविदयालय, एमबीए आणि पॉलिटेक्निकमध्ये लागू केली. करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी अहोरात्र लढणाऱ्या कोविड योद्ध्यांचा यथोचित सन्मान करण्याचा प्रयत्न केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:43 AM 03-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here