मृत्यु पश्चात् केले देहदान
रत्नागिरी :- व्यवसाय करीत असतांना सामाजिक हित जोपासणे तितकेच महत्वाचे असते अशी शिकवण देणारे आणि जैन समाजातील प्रत्येक सणाला पुढाकार घेऊन त्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यास नेहमीच अग्रेसर असणारे किरणशेठ वस्तिमल ओसवाल यांचे नुकतेच दु:खद निधन झाले . काही व्यक्तिना कधीच विसरणे शक्य होत नाही. त्यापैकीच किरण शेठ ओसवाल हे एक होते. त्यांच्या निधनानंतर रत्नागिरीत दु:ख व्यक्त करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
प्रत्येक सामजिक कार्यात मग ती महावीर जयंती असो , पर्युषण पर्व असो , इत्यादि मध्ये त्यांचा हिरीरिने सहभाग असे. परिणामी जैन समाजात युवकांपासून वयोवृध्दांपर्यंत सर्वांनाच ते खूप जवळचे वाटत. केवळ रत्नागिरी शहरातीलच नव्हे तर , जिल्ह्यातील जैन समाजात त्यांचे स्नेहाचे संबध होते. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची समाजाजवळचे नाते घट्ट झाल्याने विविध समाजात त्यांचे घरोब्याचे संबध निर्माण झाले होते.
त्यांचे वडिल वस्तिमल शेठ विश्व हिंदू परिषद रत्नागिरी चे अध्यक्ष होते. गोखले नाका येथील संतोष फर्निशिंगचे ते संस्थापक होत. किरणशेठ ओसवाल निधन पश्चात देखील समाज उपयोगी कार्य करुन गेले असून त्यांनी एक आदर्श पुढे ठेवत समाजकार्याचा वसा आपल्या सोबत चिरंतन सुरु ठेवल्याचे देहदान हे द्योतक ठरले आहे . त्यानी मृत्यू पश्चात् आपले देहदान करण्यात यावे, अशी इच्छा जाहिर केली होती. त्यांच्या इच्छे नुसार त्यांचा देह डेरवण येथील वालावलकर मेडिकल कॉलेजला दान करण्यात आला आहे. मृत्यूनंतर देखील आपल्या शरीराचा उपयोग व्हावा ही भावना अत्यंत थोर असून त्यातून किरणशेठ सारखी माणसे किती निरपेक्ष भावनेने जगली हे अधोरेखित होते. देहदानाच्या निर्णयामुळे त्यांच्या पश्चातही त्यांचे कौतूक होत आहे.
त्यांच्या पश्चात दोन बंधू, पत्नी, पुत्र, कन्या, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर जैन समाजासह अनेक स्तरावरील व्यक्तींनी , सामाजिक संस्था , राजकीय मंडळींनी त्यांना श्रध्दांजली वाहून दु:ख व्यक्त केले. रत्नागिरीतील जैन समाजाने आपले व्यवसाय बंद ठेवून किरणशेठना श्रध्दांजली वाहिली.
